मुस्लिमांनी अयोध्येचा दावा सोडावा अन्यथा भारत सीरिया बनेल - श्री श्री रवि शंकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 12:57 PM2018-03-05T12:57:03+5:302018-03-05T13:01:35+5:30
राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
नवी दिल्ली - राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. राम मंदिर मुद्यावर लवकर तोडगा निघाला नाही तर भारत सीरिया बनेल असे रविशंकर यांनी म्हटले आहे. राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व पक्षकारांशी रवि शंकर प्रसाद मागच्या बऱ्याच काळापासून चर्चा करत आहेत.
राम मंदिर वादावर लवकर तोडगा निघाला नाही तर भारताचा सीरिया बनेल असे विधान त्यांनी इंडिया टुडेशी बोलताना केले. सीरियामधील गृहयुद्ध लक्षात घेऊन मुस्लिमांनी अयोध्येवरील दावा सोडून द्यावा. सदिच्छा, मित्रभावनेच्या हेतूने मी मुस्लिमांना अयोध्येवरील दावा सोडण्याचे आवाहन करतो. अयोध्या हे मुस्लिमांच्या विश्वासाचे स्थान नाही असे रवि शंकर यांनी सांगितले.
इस्लाम वादग्रस्त जागेमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी देत नाही. भगवान प्रभू रामचंद्रांचा दुसऱ्या जागेवर जन्म होऊ शकत नाही असे 61 वर्षीय अध्यात्मिक गुरु रवि शंकर यांनी म्हटले आहे. रविशंकर यांनी ज्या सीरियाचा दाखला दिला तिथे राष्ट्राध्यक्ष बाशर अल असाद यांचे सरकार आणि त्यांच्या विरोधी गटांमध्ये रक्तरंजित लढाई सुरु आहे. अयोध्य प्रकरणावरुन तशीच स्थिती भारतात उदभवेल असे रवि शंकर यांना वाटते. सीरियामध्ये सुरु असलेल्या या गृहयुद्धाचे हे आठवेवर्ष असून आतापर्यंत 4 लाख 65 हजार सीरियन नागरिकांचा या लढाईत मृत्यू झाला आहे. दहालाखापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.