मुस्लिमांसाठी भारतापेक्षा योग्य देश नाही - भाजपाने आमिरला सुनावले

By admin | Published: November 24, 2015 02:49 PM2015-11-24T14:49:57+5:302015-11-24T15:13:11+5:30

मुस्लिमांसाठी अतुल्य भारतापेक्षा इतर कोणताही देश योग्य नाही आणि हिंदूपेक्षा चांगला शेजारी नाही, असे भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी म्हटले.

For Muslims, there is no better country than India - BJP has told Aamir | मुस्लिमांसाठी भारतापेक्षा योग्य देश नाही - भाजपाने आमिरला सुनावले

मुस्लिमांसाठी भारतापेक्षा योग्य देश नाही - भाजपाने आमिरला सुनावले

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - देशातील असहिष्णू घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सोडून जाण्याचे वक्तव्य करणा-या अभिनेता आमिर खानवर चहुबाजूंनी टीका होत असून भारतीय जनता पक्षानेही आमिरच्या वक्तव्याची निंदा केली आहे. 'मुस्लिमांसाठी अतुल्य भारतापेक्षा इतर कोणताही देश योग्य नाही' असे सांगत भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी आमिरला खडसावले. पत्रकार परिषदेत बोलताना ' याच देशाने तुला स्टार बनवले हे विसरू नकोस' असे खडे बोल हुसैन यांनी सुनावले.  तसेच आमिरच्या वक्तव्याने देशाची प्रतिमा डागाळली अशी टीकाही करण्यात येत आहे.
देशातील असहिष्णूतेविरोधात वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवल्याचे आमिरने काल एका कार्यक्रमात म्हटले होते. त्यानंतर चहुबाजूंनी त्याच्यावर टीकेचा भडिमार झाला. बॉलिवूडमधील अनेक कलावंत तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आमिरवर हल्ला चढवत त्याच्या वक्तव्याचा निषेध केला, मात्र आमिरचे वक्तव्य म्हणजे लाखो लोकांच्या मनातील भावनाच असल्याचे सांगत भाजपाच्या विरोधकांनी ही संधी साधून सरकारवर टीका केली. सरकार व मोदीजींना प्रश्न विचारणाऱ्यांना देशविरोधी म्हणण्यापेक्षा सरकारने हे जाणून घेतलं पाहिजे की त्यांच्यासाठी कोणती गोष्ट त्रासदायक ठरत आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सरकारवर हल्ला चढवला व आमिरला पाठिंबा दर्शवला.
मात्र भाजपाने या सर्वांना प्रत्युत्तर देत भारत असहिष्णू नसल्याचे स्पष्ट केले. ' आमिर खानला भारतापेक्षा योग्य देश सापडणार नाही. भारत हा असा एकमेव देश आहे जो कलावंतांचा धर्म पाहत नाही, जर तू (आमिर) भारत सोडून कुठेही गेलास तर तुला तिथे फक्त असहिष्णूताच दिसेल असे हुसैन म्हणाले. 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी आमिरला दिलेल्या पाठिंब्यासंदर्भात बोलताना हुसैन म्हणाले 'शेकडो दंगली व हजारोंच्या लोकांच्या हत्येचा दाग असलेल्या काँग्रेसने भारताला सहिष्णूता शिकवायची गरज नाही.
 
शिवसेनेचीही आमिरवर सडकून टीका
दरम्यान शिवसेनेनेही आमिर खानवर सडकून टीका केली आहे. आम्ही इतके दिवस सापाला दूध पाजत होतो, आमिरला देश सोडायचा असेल तर त्याने पाकिस्तानात जावे, अशा शब्दांत शिवसेनेच्या रामदास कदम यांनी आमिरवर हल्ला चढवला. 
दरम्यान कालच्या वक्तव्यानंतर आज आमिरविरोधात दिल्लीतील अशोकनगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आमिरच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

Web Title: For Muslims, there is no better country than India - BJP has told Aamir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.