'हिंदूंपेक्षा जास्त रंगबेरंगी कपडे तर मुस्लिम घालतात, मग धुळवडीच्या रंगांचा तिटकारा का?'; CM योगी आदित्यनाथांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:07 IST2025-03-26T14:05:13+5:302025-03-26T14:07:14+5:30

Yogi Adityanath News: धुळवड खेळताना मशि‍दींवर रंग उडाल्याच्या घटनांवर बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते नेमकं काय म्हणाले आहेत, वाचा...

'Muslims wear more colorful clothes than Hindus, so why the aversion to the colors of the Dhulwadi?'; CM Yogi Adityanath questions | 'हिंदूंपेक्षा जास्त रंगबेरंगी कपडे तर मुस्लिम घालतात, मग धुळवडीच्या रंगांचा तिटकारा का?'; CM योगी आदित्यनाथांचा सवाल

'हिंदूंपेक्षा जास्त रंगबेरंगी कपडे तर मुस्लिम घालतात, मग धुळवडीच्या रंगांचा तिटकारा का?'; CM योगी आदित्यनाथांचा सवाल

Yogi Adityanath Latest News: उत्तर प्रदेशात काही ठिकाणी धुळवड खेळताना मशि‍दींवर रंग उडाल्याच्या घटना घडल्या. या घटनांवरून राजकारण तापले आहे. अशात एका मुलाखतीत जेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांचा पारा चांगलाच चढला. या मुद्द्याला जास्त महत्त्व दिलं गेल्याचे ते म्हणाले. 'हिंदूंपेक्षा जास्त रंगीबेरंगी कपडे मुस्लीम घालतात, मग त्यांना धुळवडीच्या रंगांचा इतका तिटकारा का?', असा थेट सवाल योगींनी उपस्थित केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत उत्तर प्रदेशात मशि‍दींवर रंग उडाल्याच्या घटनांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. मोहर्रमचा जुलूस निघतो त्यावेळी त्या झेंड्याची सावली हिंदू घरांवरही पडते, मग ती घरे अपवित्र होतात का?, असा उलट सवाल त्यांनी केला. 

हेही वाचा >>कुणाल कामराचे एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, योगी आदित्यनाथ म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य...'

'१०० हिंदू कुटुंबात एक मुस्लीम कुटुंब सुरक्षित, पण...'

योगी आदित्यनाथ म्हणाले, "१०० हिंदू कुटुंब असलेल्या परिसरात एक मुस्लीम कुटुंबही सुरक्षित आहे. त्यांना त्यांचे धार्मिक कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण, १०० मुस्लीम कुटुंब असलेल्या ठिकाणी ५० हिंदू सुरक्षित असू शकतात का? तर नाही. बांग्लादेश याचे उदाहरण आहे. यापूर्वी पाकिस्तान याचे उदाहरण होता. अफगाणिस्तानमध्ये काय झाले? जर कोणी मारला जात असेल, तर आपण सावध व्हायला हवे."

उत्तर प्रदेशातही धुळवड खेळताना मशि‍दींवर रंग उडला, असा प्रश्न यावेळी योगी आदित्यानाथ यांना विचारण्यात आला. 

योगी म्हणाले, 'मुस्लिमांचे हे दुटप्पी वर्तन'

प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, "रंग खेळला गेला, तर उडाला असेल. यामुळे कुणाचे अस्तित्व संपत नाही. तुम्ही मला सांगा की, मुहर्रमचा जुलूस निघतो. मग त्या झेंड्याची सावली मंदिरावर किंवा आजूबाजूच्या घरांवर पडत नाही का? मग त्यामुळे हिंदूचे घर अपवित्र होते का? ज्याला रंगाचा तिटकारा आहे, त्याच्यावर रंग टाकू नका असे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही पडला आणि प्रशासन तो साफ करून रंगवण्याचे काम करत आहे. पण त्यावरून इतका गोंधळ कशाला?"

"ते (मुस्लीम) रंगीबेरंगी कपडे परिधान करत नाहीत का? हिंदूंपेक्षा जास्त रंगीबेरंगी कपडे तर मुस्लीम घालतात. मग रंगांचा इतका तिटकारा का? हे तर दुटप्पी वर्तन आहे. रंगीबेरंगी कपडे घातलात, पण रंग पडला तर लगेच गोंधळ. इतके दुटप्पी आचरण का कशाला हवे. गळाभेट घ्या. खूप सारे मुस्लीम रंग खेळतात. शाहजहापूरमध्ये तर नवाब साहेबांची यात्रा निघते", असे उत्तर योगी आदित्यनाथ यांनी दिले. 

Web Title: 'Muslims wear more colorful clothes than Hindus, so why the aversion to the colors of the Dhulwadi?'; CM Yogi Adityanath questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.