'मुस्लिम कोणाचंही ऐकणार नाहीत, ते जास्तीत जास्त मुलं जन्माला घालतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 09:05 AM2019-10-28T09:05:53+5:302019-10-28T09:08:36+5:30
दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना सरकारी नोकरी नाही; भाजपा सरकारचा निर्णय
गुवाहाटी: दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. यावरुन ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आसाम सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. इस्लाम केवळ दोन मुलं जन्माला घालण्यावर विश्वास ठेवत नाही. ज्यांना या जगात यायचंय, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असं अजमल यांनी म्हटलं आहे.
आसाम सरकारनं काही दिवसांपूर्वीच दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाष्य करताना अजमल यांनी मुस्लिमांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा, असं आवाहन केलं. 'आमच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसंही सरकार आम्हाला नोकऱ्या देत नाही. आम्हाला सरकारकडून तशी अपेक्षादेखील नाही. त्यामुळे मुस्लिमांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा. त्यांना चांगलं शिक्षण द्यावं. त्यामुळे ते प्रगती करतील आणि हिंदूंना नोकऱ्या देतील,' असं अजमल यांनी म्हटलं.
शनिवारीदेखील अजमल यांनी अशाच प्रकारचं विधान केलं होतं. 'मुस्लिम समाज मुलं जन्माला घालत राहील. ते कोणाचंही ऐकणार नाहीत. या जगात जे येऊ इच्छितात, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असं आमच्या धर्माला वाटतं,' असं अजमल यांनी म्हटलं होतं. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली 22 ऑक्टोबरला झालेल्या कॅबिनेट बैठकीत दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना सरकारी नोकरी ने दण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 1 जानेवारी 2021 नंतर ज्यांना दोनपेक्षा अधिक मुलं आहेत, त्यांचा सरकारी नोकरीसाठी विचार केला जाणार नाही.