मागे हटावेच लागेल, चीनला सुनावले; ड्रॅगनची अट भारताला अमान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:11 AM2020-08-24T00:11:33+5:302020-08-24T07:06:01+5:30
चीनने भारताला फिंगर १ वरून मागे हटण्याचा प्रस्ताव देत स्वहद्दीत मागे हटण्याची तयारी दर्शवली. भारताने हा प्रस्ताव अमान्य केला.
नवी दिल्ली : ईशान्य लद्दाख सीमेवर चीनच्या कागाळ्या सुरूच आहेत. स्वहद्दीत मागे हटण्याची तयारी दाखवताना चीनने ठेवलेल्या अटी भारताने धुडकावून लावल्या. वारंवार सकारात्मक चर्चेच्या बातम्या प्रसारित करणा?्या चीनचा प्रत्यक्ष हेतू वेगळाच आहे. आम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही. उलट फिंगर चारमध्ये भारतीय सैनिक गेल्या सहा दशकांपासून तैनात असल्याने मागे हटणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले. गेल्या तीन महिन्यांपासून चीनी ड्रॅगनची भारताने वेगवेगळ्या स्तरावर कोंडी केली आहे. चीनने स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय संबंध पूर्ववत होणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले,
हा प्रस्ताव धुडकावला-
चीनने भारताला फिंगर १ वरून मागे हटण्याचा प्रस्ताव देत स्वहद्दीत मागे हटण्याची तयारी दर्शवली. भारताने हा प्रस्ताव अमान्य केला. स्वहद्दीत मागे हटणार नाही, तुम्हीच १९९३ च्या करारानुसार मागे हटा, बांधकाम हटवा असे भारताने चीनला खडसावले. लष्करी, राजनैतिक स्तरावरील चर्चेदरम्यान चीन रोजच रंग बदलत असल्याने भारताने युद्धसज्जता केली आहे.
फिंगर ४ व ८ जवळ चीनने मोठ्या प्मार्णावर स्वहद्दीत बांधकाम केले. रस्ता बांधला. तात्पुरती चौकी उभारली. भारताने त्यास आक्षेप घेतला. कराराप्रमाणे चीन स्वहद्दीत पुढे येवू शकत नाही.
नेपाळचा भूभाग चीनने बळकावला
नेपाळच्या सीमावर्ती सात जिल्ह्यांतील काही भूभाग चीनने बळकावला आहे, असे नेपाळच्या कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षण विभागाने एका अहवालात म्हटले आहे. तसेच आणखी भूभाग घशात घालण्याचे चीनचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असेही या खात्याने नेपाळ सरकारला कळविले आहे. हा अहवाल दडपण्याचे प्रयत्न नेपाळ कम्युनिस्ट पक्षाकडून होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या विस्तारवादी धोरणाकडे नेपाळ कम्युनिस्ट पक्षाकडून कानाडोळा करण्यात येत आहे.