"जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत असं होऊ देणार नाही", मुस्तफाबादच्या नामांतरवर आप नेते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:27 IST2025-02-11T11:26:53+5:302025-02-11T11:27:07+5:30

Mustafabad Name Change Row : मुस्तफाबाद मतदारसंघातून विजयी झालेले भाजप आमदार मोहन सिंह बिष्ट यांनी मुस्तफाबादचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले आहे.

Mustafabad Name Change Row : aap leader haji yunus opposed name change of mustafabad | "जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत असं होऊ देणार नाही", मुस्तफाबादच्या नामांतरवर आप नेते संतापले

"जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत असं होऊ देणार नाही", मुस्तफाबादच्या नामांतरवर आप नेते संतापले

Mustafabad Name Change Row : नवी दिल्ली : नुकताच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात भाजपने मोठा विजय मिळवला, तर आपला पराभवाचा सामना करावा लागला. आता भाजप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त आहे. अशातच, विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील एका शहराचे नामांतर करण्याची चर्चा सुरु आहे. 

मुस्तफाबाद मतदारसंघातून विजयी झालेले भाजप आमदार मोहन सिंह बिष्ट यांनी मुस्तफाबादचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले आहे. मुस्तफाबाद मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर मोहन सिंह बिष्ट यांनी घोषणा केली की, मुस्तफाबादचे नाव आता शिव विहार किंवा शिवपुरी असे ठेवले जाईल. त्यांच्या या विधानानंतर आता निषेध सुरू झाला आहे. आपचे माजी आमदार हाजी युनूस म्हणाले की, "जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत असे होऊ देणार नाही".

एका बाजूला ५८ टक्के हिंदू आहेत तर दुसऱ्या बाजूला ४२ टक्के मुस्लिम आहेत. मग, मुस्तफाबादचे नाव बदलण्यात विरोधकांना काय अडचण आहे? असा सवाल मोहन सिंह बिष्ट यांनी केला होता. यावर हाजी युनूस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मुस्तफाबादमध्ये ४२ टक्के मुस्लिम नाहीत, तर ४८.९ टक्के आहेत. मोहन सिंह बिष्ट यांनी आपली माहिती दुरुस्त करावी. मतदार यादी तपासून किती मुस्लिम आहेत, हे पाहिले पाहिजे, असे  हाजी युनूस यांनी म्हटले.

पुढे हाजी युनूस म्हणाले की, मुस्तफाबादचे नाव मुस्तफाबादच राहील, कितीही इच्छा असली तरी ते बदलले जाणार नाही. तसेच, हाजी युनूस यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्तफाबादचे नाव बदलले जाणार नाही. तसेच, एमसीडी निवडणुकीपूर्वी उपराज्यपालांनी शिव विहारचे नाव बदलून पूर्व करावल नगर केले. त्यावेळी ते शिव विहारचे नाव का वाचवू शकले नाहीत? मग ते मुस्तफाबादचे नाव कसे बदलतील? असा सवाल हाजी युनूस यांनी केला.

याचबरोबर, मुस्तफाबादच्या लोकांनी बांगड्या घातलेल्या नाहीत, असा इशारा देत हाजी युनूस यांनी म्हटले की, आगामी काळात विधानसभेच्या जागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर त्यांना हवे असेल तर ते पूर्व करावल नगरचे नाव शिव पुरी किंवा इतर काहीही ठेवू शकतात. मुस्तफाबादचे नाव मुस्तफाबाद राहील, असे हाजी युनूस यांनी सांगितले.
 

Web Title: Mustafabad Name Change Row : aap leader haji yunus opposed name change of mustafabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.