मुजफ्फरनगर दंगल, गुन्ह्याच्या तपशिलात विसंगती; पोलिसांनी केलेल्या वर्णनावर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 04:17 AM2020-01-24T04:17:57+5:302020-01-24T04:19:29+5:30
नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधात गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलनात निदर्शकांकडे शस्त्रे होती व त्यांनी दंगली व जाळपोळ केली, असे पोलिसांनी म्हटले होते.
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधात गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलनात निदर्शकांकडे शस्त्रे होती व त्यांनी दंगली व जाळपोळ केली, असे पोलिसांनी म्हटले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता दाखल झालेल्या गुन्ह्यात १०७ जणांची नावे होती व त्या सगळ्यांवर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला. ७३ जणांना अटकही झाली.
दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपशिलात मात्र ठळक विसंगती होत्या. त्यात पोलिसांनी केव्हा आणि कुठे शस्त्रास्त्रे जप्त केली व ती कोणती होती याचा तपशीलच दिलेला नाही. हा तपशील आता न्यायालयाच्या दप्तरात उपलब्ध आहे. त्यामुळे त्या घटनेचे पोलिसांंनी जे वर्णन केले त्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे प्रकरण आरोपींकडून दंगली आणि सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या हानीशी संबंधित असले तरी पोलिसांनी घटना घडली त्यादिवशी ओळख पटलेल्या आरोपीकडून कोणतेही शस्त्र जप्त केलेले नाही. दुसरे म्हणजे पोलिसांचा आता असा दावा आहे की, आम्ही अनेक तासांनंतर शस्त्रास्त्रे जप्त केली. ही वस्तुस्थिती मुजफ्फरनगर पोलिसांनी जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांपुढे अधिकृतपणे ठेवली. या न्यायालयात एकत्रित जामीन अर्जांवर सुनावणी होत आहे. (वृत्तसंस्था)
घटनास्थळावरून पोलिसांनी ही शस्त्रे केली जप्त
‘२० डिसेंबर २०१९ रोजी घटना घडली व त्याच्या दुस-या दिवशी घटनास्थळावरून देशी बनावटीच्या तीन .३१५ बोअर, तीन देशी बनावटीच्या १२ बोअर, तीन एसबीबीएल १२ बोअर पिस्टोल, एक डीबीएल देशी बनावटीची गन, तीन चाकू, तीन तलवारी, ३० खोके गोळ्या (बुलेटस्), सात जिवंत काडतुसे, आठ खोके बुलेटस् १२ बोअर, तीन बुलेट .३१५, चार खोके बुलेटस् ३२ बोअर, एक जिवंत बुलेट ३१ बोअर, दोन जिवंत बुलेटस् १२ बोअर आणि चार जिवंत बुलेटस् १२ बोअर रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली’, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.