Muzaffarpur Shelter Home Case: बिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 05:34 PM2018-08-08T17:34:21+5:302018-08-08T17:34:41+5:30
बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालिकाश्रमात झालेल्या बलात्कारा कांड प्रकरणी राज्याच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी राजीनामा दिला आहे.
पाटणा - बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालिकाश्रमात झालेल्या बलात्कारा कांड प्रकरणी राज्याच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला ब्रजेश ठाकूर आणि मंजू वर्मा यांचे पती चंद्रेश्वर वर्मा यांचे संबंध असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून मंजू वर्मा यांच्यावर विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत होता.
Muzaffarpur Shelter Home Case: Bihar Minister Manju Verma resigns. Her husband has been accused of having links with alleged mastermind Brajesh Thakur pic.twitter.com/ayxu5mo6xj
— ANI (@ANI) August 8, 2018
मुझफ्फरपूर बालिकाश्रम बलात्कार कांडाप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू आहे. या तपासाची पाळेमुळे मंजू वर्मा यांचे पती चंद्रेश्वर वर्मा यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बालिकाश्रमात अल्पवयीन मुलींच्या करण्यात आलेल्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर आणि मंजू वर्मा यांचे पती चंद्रेश्वर वर्मा सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते, असा दावा प्रसारमाध्यमांमधून करण्यात आला होता. तसेच ब्रजेश ठाकूर याने यावर्षी मंजू वर्मा यांच्यांशी फोनवरून चर्चा केल्याचाही आरोप करण्यात आला होता. मात्र मंजू वर्मा यांनी स्वत:वरील आणि आपल्या पतीवरील आरोप फेटाळून लावले आहेत.
मुजफ्फरपूर येथील बालिकागृह चक्क बलात्कारगृह बनल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आता समोर आला होता. गेल्या महिन्यात एका मुलीच्या हत्येच्या प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या प्रकरणानंतर नवनव्या धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. या बालिकागृहात मागील काही दिवसांत 34 मुलींवर बलात्कार झाल्याची बाब समोर आली.