ऐकावं ते नवलंच! शेतकऱ्याने केली शुगर फ्री आंब्याची लागवड; 16 वेळा बदलतो रंग, जाणून घ्या, खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 03:21 PM2022-07-01T15:21:46+5:302022-07-01T15:24:00+5:30
Sugar Free Mango : अमेरिकन ब्युटी ही आंब्याची ही प्रजाती शुगर फ्री आहे. त्याचा आकार नेहमीच्या आंब्यापेक्षा वेगळा आणि थोडा मोठा आहे.
नवी दिल्ली - आंबा हा सर्वांनाच आवडतो. पण सध्या शुगर फ्री आंब्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मुशाहरी ब्लॉक येथील शेतकरी राम किशोर सिंह यांच्या बागेत हा शुगर फ्री आंबा पिकतो. तो आंब्यासारखा दिसत नसला तरी ती आंब्याचीच एक प्रजाती आहे, ज्याला अमेरिकन ब्युटी असं म्हणतात. मुझफ्फरपूर हे शहर खरं तर देश आणि जगभरात लिची या फळाच्या उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आता शुगर फ्री आंब्यामुळे ते खूप चर्चेत आलं आहे.
डायबेटिसच्या रुग्णांना इच्छा असूनही आंबा खाता येत नाही. मात्र, आता बिहारमधील या शेतकऱ्याने केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे रुग्णांनाही आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. शेतकरी राम किशोर सिंह यांच्या बागेत शुगर फ्री आंबा पिकतो. अमेरिकन ब्युटी ही आंब्याची ही प्रजाती शुगर फ्री आहे. त्याचा आकार नेहमीच्या आंब्यापेक्षा वेगळा आणि थोडा मोठा आहे. एका आंब्याचं वजन हे सुमारे अर्धा किलो आहे आणि हा आंबा पिकण्यासाठी 5 महिने लागतात.
अमेरिकन ब्युटी आंबा जून-जुलैमध्ये पिकण्यास सुरुवात होते, म्हणजे आंब्याचा सीझन संपतो, तेंव्हा हा आंबा पिकण्यास सुरूवात होते. या आंब्यामध्ये नेहमीच्या आंब्यासारखेच गुणधर्म आहेत. पण, हा गोडीला मात्र कमी आहे. कृषी विद्यापीठ समस्तीपूर आणि नॅशनल रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ लिचीच्या शास्त्रज्ञांनीही त्याची चव चाखली असून, त्याची चव सामान्य आंब्यांपेक्षा कमी गोड आणि साखरमुक्त असल्याचं आढळून आलं आहे.
सरडा जसा रंग बदलतो तसा हा आंबाही पिकेपर्यंत अनेकदा रंग बदलतो. आंबा झाडावरच असतो; पण तो हिरवा-पिवळा-लालसर होण्यापूर्वी हा आंबा 16 वेळा रंग बदलतो. पूर्ण पिकल्यावर त्याचा रंग लाल होतो. बाजारात त्याची किंमतही जास्त असून, एका किलोला चार हजार रुपये दर आहे. म्हणजे विचार केला तर 2 हजार रुपयांना एक आंबा पडतो.