'माझा मेंदूच माझा शत्रू'... न्यूज अँकरच्या सुसाइड नोटने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 12:30 PM2018-04-02T12:30:44+5:302018-04-02T12:30:44+5:30
हैदराबादेत एका न्यूज अँकरनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःच्या घरातील पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तिने ही आत्महत्या केली आहे.
तेलंगणा- हैदराबादेत एका न्यूज अँकरनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःच्या घरातील पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन तिने ही आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी तिने एक सुसाइड नोटही मागे ठेवली आहे. त्या सुसाइड नोटमध्ये तिने आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे.
रविवारी रात्री 36 वर्षीय न्यूज अँकर राधिका रेड्डी हिने ती राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. पोलिसांना राधिकाच्या बॅगमध्ये एक सुसाइड नोटही मिळाली आहे. त्या सुसाइड नोटमध्ये तिनं लिहिलं आहे की, माझा मेंदूच माझा शत्रू आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या मते, ही टीव्ही अँकर मानसिक तणावाखाली होती.
Anchor of a news channel allegedly committed suicide by jumping off from fifth floor of her residence in #Hyderabad's Moosapet. Case registered, investigation underway
— ANI (@ANI) April 1, 2018
कुक्कटपल्ली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मजीद म्हणाले, राधिका हिनं कार्यालयातून घरी परतल्यानंतर काही वेळानं आत्महत्या केली. कार्यालयातून घरी परतल्यानंतर ती राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर गेली आणि तिनं उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. गच्चीवरून उडी घेतल्यानंतर राधिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राधिकाला 14 वर्षांचा एक मुलगा असून, तो स्वतःच्या आजी-आजोबांसोबत राहतो. राधिकाचा सहा महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला होता. राधिकाचा मुलगाही मानसिकदृष्ट्या अपंग असल्याचं समोर आलं आहे.