'हिंदू धर्मावर माझी पूर्णपणे श्रद्धा, मी मंदिरातही जातो, पण....'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 08:34 PM2019-12-08T20:34:09+5:302019-12-08T20:34:32+5:30
शिवसेनेच्या भूमिकेमुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं की, काँग्रेस-राष्ट्रवादीने हिंदुत्ववादी पक्षाला साथ का दिली
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे जनक खासदार शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यामध्ये पवार यांनी महाविकास आघाडी, काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार आणि मोदींसोबतच्या बैठकीवरील प्रश्नांना स्पष्टपणे उत्तरे दिली. हिंदुत्ववादी संघटना किंवा पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते. मात्र, शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शिवसेनेच्या भूमिकेमुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं की, काँग्रेस-राष्ट्रवादीने हिंदुत्ववादी पक्षाला साथ का दिली? असे अनेक प्रश्न विचारल जात आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनाही हिंदुत्वासंदर्भातील एक प्रश्न विचारण्यात आला होता. भारतात हिंदुकरण झालंय असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, नाही नाही... आपण हिंदुराष्ट्रात राहत आहोत, या मताशी मी सहमत नाही. आपण एममेकांच्या धर्मांचा आदर करतो, ती व्यक्तिगत बाब आहे. हिंदु धर्मावर माझी पूर्णपणे श्रद्धा आहे, मी मंदिरातही जातो. पण, सार्वजनिक जीवनात मी सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील जडण-घडण संदर्भातही मनमोकळेपणे गप्पा मारल्या.
शरद पवार यांनी पुढाकार घेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र करत महाविकास आघाडी निर्माण केली. महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी शपथही घेतली. त्या प्रयोगाची देशात चर्चा झाली. त्यामुळेच, महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या शरद पवारांचा चाणक्य असा उल्लेख देशपातळीवर होत आहे. विशेष म्हणजे, देशपातळीवर सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपची घोडदौड रोखू शकतो, असे पवार यांनी यापूर्वीही बोलून दाखवले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशात पर्याय पाहिजे आहे मात्र त्यांना पर्याय उभा करण्यात विरोधी पक्षांना अपयश आल्याचंही त्यांनी मान्य केलं.