करकरेंच्या मृत्यूच्या दिवशी माझे सुतक सुटले; भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह यांचे बेताल वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 06:48 AM2019-04-20T06:48:12+5:302019-04-20T06:48:21+5:30
मी तुरुंगात गेले त्या दिवसापासून सुुरू झालेले सुतक मिटले, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व भोपाळमधील भाजपच्या लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे.
नवी दिल्ली/भोपाळ : मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूच्या दिवशी माझे ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवसापासून सुरू झालेले सुतक मिटले, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व भोपाळमधील भाजपच्या लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे.
त्याचा सर्व स्तरांतून निषेध होत असून, विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या वक्तव्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. एका बॉम्बफोटातील आरोपीने दहशतवाद्याशी लढताना हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकाऱ्याविषयी असे उद्गार काढणे अतिशय निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
सोशल मीडियावरही प्रज्ञासिंह यांच्यावर या वक्तव्याबाबत टीका होत आहे. अशा महिलेला भाजपने निवडणुकीची उमेदवारी दिलीच कशी, असाही सवाल आता विचारला जाऊ लागला आहे आहे. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी जे. एफ. रिबेरो यांनीही या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपने मात्र प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याविषयी अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही हेमंत करकरे यांना हुतात्माच मानतो. प्रज्ञासिंह यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक आहे. प्रज्ञा सिंह यांचा जो शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असावे, असे भाजपने म्हटले आहे.
प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी माझ्याविरोधात काही पुरावा नसेल तर माझी सुटका करावी अशी विनंती मी हेमंत करकरे यांना केली होती. त्यावर पुरावे नसले तर शोधून काढू, पण तुमची सुटका करणार नाही, असे करकरे म्हणाले. तेव्हा मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल असा शाप दिला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणात करकरे यांनी मला विनाकारण गोवले आणि अतिशय वाईट वागणूक दिली. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी माझे सुतक सुरू झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी हेमंत करकरे यांना मारण्यात आले, त्या दिवशी हे सुतक संपले. प्रभू रामचंद्राने एका संन्याशांच्या मदतीने रावणाचा अंत केला होता. २००८ सालीही तेच घडले.
साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यातून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे एका प्रकारे समर्थनच झाले आहे. त्यांनी करकरे यांची तुलना रावणाशी, तर पाकिस्तानी दहशतवाद्यांची तुलना थेट संन्याशाशी केली आहे. असे करताना त्यांनी स्वत: प्रभू रामचंद्र असल्याचेच भासवले आहे.
मुंबईवर २००८ साली झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे व त्यांचे सहकारी अशोक कामटे व विजय साळस्कर शहीद झाले होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह प्रमुख आरोपी आहेत. आपण आजारी असून, स्तनांचा कर्करोग झाला आहे, कोणाच्याही आधाराशिवाय आपल्याला चालता येत नाही, अशी विनंती करून त्यांना जामिनासाठी अर्ज केला आणि त्याच कारणामुळे तो न्यायालयाने मंजूर केला. सुटल्यानंतर अलीकडेच त्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांच्या विरोधात त्या लढत देत आहेत.
याआधी २00८ च्या मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजप नेत्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटांत निरपराध हिंदुंना गोवले जात असल्याची भाषणे केली होती. तसेच हेमंत करकरे हे हिंंदुविरोधी असल्याचा आरोप तेव्हाच्या सभांमध्ये करण्यात आला होता.
शिवराज सिंह चौहान यांनीही आपल्या भाषणात करकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र मुंबई दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे व अन्य पोलीस अधिकारी शहीद झाल्यानंतर भाजपने तो मुद्दा आणण्याचे टाळले होते.
>इंद्रेश कुमार यांच्याकडून प्रज्ञासिंहचे समर्थन
नाशिक : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय वक्ते इंद्रेश कुमार यांनी समर्थन केले आहे. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी त्यांनी सत्य परिस्थिती कथन केल्याचे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज वैध ठरविला आहे. शिवाय सहा पैकी चार आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता झाली असून, दोन आरोपांमध्ये त्या जामिनावर असल्याचे इंद्रेशकुमार यांनी सांगितले.
>संतापानंतर दिलगिरी
आपल्या विधानाने संतापाची लाट उसळल्याचे पाहून व निवडणूक आयोगानेही वक्तव्याची गंभीर दखल घेत खुलासा मागितल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिलगिरीचा मार्ग स्वीकारला. हेमंत करकरे हे शहीदच आहेत, असे सांगतानाच, साध्वीने आपल्या वक्तव्याने देशाच्या शत्रूंचाच फायदा होत असल्याने आपण विधान मागे घेत आहोत आणि दिलगिरी व्यक्त करीत आहोत, असे सांगून टाकले. मात्र ही पश्चातबुद्धी असून, त्यांच्या मनात काय आहे, ते त्यांनी आधीच बोलून दाखवले आहे, अशी टीका काँग्रेस व अन्य विरोधकांनी केली.
>सर्वच विरोधकांचा हल्लाबोल
याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. प्रज्ञा सिंहना उमेदवारी देऊ न आपण देशद्रोही असल्याचे भाजपने सिद्ध केले आहे.
- रणदीप सुरेजवाला, काँग्रेसचे प्रवक्ते
अशा प्रकारचे वक्तव्य करुन हेमंत करकरे यांचा अवमान करण्याचे हिंमत भाजपला होतेच कशी?
- असदुद्दीन ओवेसी, प्रमुख, एमआयएम
हेमंत करकरे यांच्याविषयी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे खरे रुप जगासमोर आले आहे.
- अरविंद केजरीवाल, प्रमुख, आप
जे देशासाठी शहीद झाले त्यांच्यावर कोणीही टिप्पणी करू नये. करकरे हे इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते. त्यांच्याबाबत आम्हा सगळ््यांना गर्वच वाटतो. - दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते
बॉम्बस्फोटातील आरोपीला उमेदवारी देणारा भाजप देशद्रोही असून जनतेने त्याला कोपऱ्यात ढकलले पाहिजे.
- माकप
करकरे यांच्याविषयी अतिशय घाणेरडे उद्गार काढणाºया प्रज्ञासिंगवर भाजप कारवाई करणार का?
- मेहबुबा मुफ्ती, अध्यक्ष, पीडीपी
शहीद होणाºया वर्दीतील प्रत्येकाविषयी सर्वांनी आदरानेच बोलावे. आम्ही प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहोत.
- वरिष्ठ पोलीस अधिकारी असो.
>हा शहिदांचा अपमान
महाराष्टÑ एटीएसचे प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांच्याबाबतचे साध्वी प्रज्ञा सिंह यांचे विधान हे शहिदांचा अपमान करणारे, दु:खदायक आहे. ज्यांनी आपल्या मायभूमीसाठी सर्वाेच्च त्याग केला, त्यांच्याबाबत केलेले हे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. या विचारसरणीचा मी निषेध करतो. संबंधित पक्षाच्या नेतृत्वाने या अपमानकारक वक्तव्याची दखल घेऊन योग्य कारवाई करावी.
-विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड