‘माय लॉर्ड’ होणार आता इतिहासजमा! ‘युवर आॅनर’चा वापर; केंद्र सरकारचे विजय दर्डा यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 03:50 AM2017-11-05T03:50:14+5:302017-11-05T03:50:23+5:30
देशातील न्यायालयांत वर्षानुवर्षे वापरात असलेला ‘माय लॉर्ड’ आता हद्दपार होणार आहे. त्याऐवजी ‘युवर आॅनर’ हा शब्द वापरला जाईल. केंद्र सरकारनेच हा निर्णय घेतला आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : देशातील न्यायालयांत वर्षानुवर्षे वापरात असलेला ‘माय लॉर्ड’ आता हद्दपार होणार आहे. त्याऐवजी ‘युवर आॅनर’ हा शब्द वापरला जाईल. केंद्र सरकारनेच हा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने विधि व न्याय राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे.
राज्यमंत्री चौधरी यांनी विजय दर्डा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, याबाबत सर्व संबंधितांना निर्देश देण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत.
विजय दर्डा यांनी २0 मे २0१७ रोजी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात, गुलामीची पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्याची लढाई यांचा उल्लेख करीत, विमानांवरील ‘व्हीटी’ व न्यायालयांतील ‘माय लॉर्ड’ हे शब्द संपविण्याची विनंती केली होती. या पत्राची दखल घेत, पंतप्रधानांनी कार्यवाहीच्या आधारे त्याचे उत्तर देण्यास राज्यमंत्र्यांना सांगितले होते.
तिरंग्याचा बॅच लावून संसदेत येण्याचा हक्क मिळविण्यासाठी आपणास झगडावे लागल्याचा उल्लेख विजय दर्डा यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केला होता.
नियमात बदल
राज्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या नियमातील कलम ४९ (१) नुसार ‘माय लॉर्ड’च्या ऐवजी ‘युवर आॅनर’ अथवा ‘आॅनरेबल कोर्ट’ अशी शब्दरचना केली जाऊ शकते.