“ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने अन् जवळचे नाते, एक गोष्ट नक्कीच सांगेन की...”: PM मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 05:27 AM2023-12-26T05:27:47+5:302023-12-26T05:28:20+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय निवासस्थानी ख्रिश्चन समुदायाच्या लोकांशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): ख्रिसमसच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी ख्रिश्चन समुदायाच्या लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्याशी आपले खूप जुने आणि जवळचे नाते असल्याचे सांगितले.
मी देशातील ख्रिश्चन समुदायासाठी एक गोष्ट नक्कीच सांगेन. देशासाठी तुमचे योगदान भारत अभिमानाने स्वीकारतो. स्वातंत्र्य चळवळीत ख्रिश्चन समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना ख्रिश्चन समाजातील गुरूंना भेटायचो, असे ते म्हणाले.
देशभर उत्सव
ख्रिसमसच्या निमित्ताने दिल्लीतील सेक्रेड हार्ट कॅथेड्रल कॅथॉलिक चर्च, बंगळुरू येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स कॅथेड्रलमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. कॅरोल गाणे, चमकदार ख्रिसमस दिवे आणि सजलेली ख्रिसमस ट्री लोकांना सोमवारी उत्सवात सामील होण्यासाठी मोहित करत होते.
सरन्यायाधीशांनी गायिले ख्रिसमस कॅरोल
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या चार सुरक्षा जवानांचा उल्लेख करीत ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान सैनिकांची आठवण ठेवण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयातील ख्रिसमसच्या कार्यक्रमात केले. वरिष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह उपस्थित असलेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ख्रिसमस कॅरोल देखील गायले. त्यावेळी त्यांचे सर्वांनी कौतुक केले.