Lokmat Parliamentary Awards: सर्जिकल स्ट्राइकविषयी माझा प्रश्न सैन्याबद्दल नव्हताच : दिग्विजय सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 10:30 AM2023-03-18T10:30:11+5:302023-03-18T10:30:31+5:30
न्यूज-१८ चे व्यवस्थापकीय संपादक किशोर अजवानी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
सर्जिकल स्ट्राइकवेळी मी उपस्थित केलेले प्रश्न सैन्याबद्दल नव्हते तर भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या तथ्यहीन वक्तव्यांवर होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे नेमके किती सैनिक मारले, हा तो प्रश्न होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी हात वर केले तरी काँग्रेसने कधी मला नोटीस दिली नव्हती, असे स्पष्टीकरण मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिले आहे. पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. मध्य प्रदेशची आगामी निवडणूक कमलनाथ यांच्याच नेतृत्वात लढवली जाईल, असे दिग्विजय सिंह यांनी ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना सांगितले.
न्यूज-१८ चे व्यवस्थापकीय संपादक किशोर अजवानी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. दिग्विजय सिंह म्हणाले की, आपण नेहमीच पक्षाच्या आदेशाचे पालन केले आहे. कधीही पक्षविरोधी राहिलो नाही व कोणत्याही वक्तव्यावर मला कधीही पक्षाने नोटीस दिलेली नाही. कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी कर्तव्य म्हणून फॉर्म मागे घेतला होता. मध्य प्रदेशात माझ्या नावाने विविध तथ्यहीन दावे करण्यात येतात. आपण मुख्यमंत्री राहिलो असलो तरी पुढील निवडणूक कमलनाथ यांच्याच नेतृत्वात लढू.
नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात लोकशाहीची अक्षरश: हत्या सुरू आहे. राहुल गांधींचे संसदेतील भाषण रेकॉर्डवरून उडविले गेले. ते विदेशात लोकशाहीच्या मर्यादेत राहूनच बोलले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करताना दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, संघ ही नोंदणीकृत संस्था नाही. एकीकडे भारतीय राज्यघटनेबद्दल बोलतात तर दुसरीकडे हिंदू राष्ट्राची भाषा करतात. नेपाळमध्ये ९५ टक्के लोक हिंदू असूनही ते राष्ट्र हिंदू नाही. इस्लामिक पाकिस्तानची दुर्दशा सर्व जग पाहत आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश असल्याने येथे हिंदू राष्ट्राची संकल्पना शक्य नाही आणि तसा विचार देशहिताचा नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"