नीरव मोदी प्रकरणाची चौकशी थांबवण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्याची बदली?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 06:21 PM2018-11-19T18:21:33+5:302018-11-19T18:22:52+5:30
बदलीविरोधात सीबीआय अधिकारी मनीष कुमार सिन्हा सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली : मोदी सरकार आणि सीबीआयमधील संघर्ष अद्याप सुरूच आहे. आज सीबीआयमधील एका अधिकाऱ्यानं सर्वोच्च न्यायालयात त्याच्या बदलीला आव्हान दिलं आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि नीरव मोदीच्या पीएनबी बँकेतील घोटाळ्याची चौकशी थांबवण्यासाठी आपली बदली नागपुरला करण्यात आली, असा गंभीर आरोप सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी केला आहे.
आपल्या बदलीचा आदेश रद्द करण्यात यावी, अशी मागणी सिन्हा यांनी न्यायालयाकडे केली. नीरव मोदी, मेहुल चौक्सी यांनी केलेल्या घोटाळ्यावरुन काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थान यांच्यावर लाचखोरीचा आरोप आहे. या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या पथकात मनीष कुमार सिन्हा यांचा समावेश होता. मात्र त्यांची नागपुरला बदल करण्यात आली. या आदेशाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाकडे मनीष कुमार सिन्हा यांनी याचिका दाखल केली आहे. या घटनापीठात न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हेच घटनापीठ सीबीआय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी घेणार आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. आलोक वर्मा यांना मोदी सरकारनं पदावरुन तडकाफडकी हटवलं आहे.