"माझी पत्नी सुंदर, मी कांड करतो", सपा आमदाराचे बेताल वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 06:13 PM2022-02-18T18:13:28+5:302022-02-18T18:14:49+5:30
Amitabh Bajpai : आता कानपूरमधील आर्यनगरमधील समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ वाजपेयी यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, आता उर्वरित टप्प्यात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अनेक नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता कानपूरमधील आर्यनगरमधील समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ वाजपेयी यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचे विधान हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे.
या व्हिडीओमध्ये अमिताभ वाजपेयी सुंदरकांडवरून काही टिप्पणी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका कार्यक्रमाचा आहे, ज्यामध्ये अमिताभ वाजपेयी यांनी म्हटले आहे की, 'मी सुंदरकांड यासाठी केले आहे, कारण माझी पत्नी सुंदर आहे आणि मी कांड करत असतो.' नुकतेच अमिताभ वाजपेयी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि यावेळी त्यांनी सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान प्रचंड गर्दी झाली होती.
यह कैसा कांड कर दिए ? सुंदर नही, बेहूदा है।
— Anil Tiwari (@Interceptors) February 18, 2022
ऊपर से लोग ताली पीट रहे है। हद्द है। pic.twitter.com/S5euscRt4C
धार्मिक कार्यक्रमाला कॉमेडी शो बनवण्याच्या उद्देशाने त्यांनी असे विधान केले की, जे धर्माशी संबंधित लोकही याला हिंदू धर्मग्रंथांचा अपमान म्हणत आहेत. कार्यक्रमादरम्यान, त्यांनी सर्व लोकांसमोर हे मान्य केले की, ते कांड करत असतात आणि त्याची पत्नी सुंदर आहे, म्हणूनच त्यांनी या सुंदरकांडचे आयोजन केले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिले स्पष्टीकरण...
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या विधानावर स्वतःच स्पष्टीकरण देताना अमिताभ वाजपेयी म्हणाले की, धर्मग्रंथाचा अपमान करण्यासारखे काही नाही आणि हा भाजपाच्या लोकांचा अपप्रचार आहे.
विधानाला वैयक्तिक टिप्पणी असल्याचे म्हणाले...
दरम्यान, हा व्हिडिओ गेल्या 14 फेब्रुवारीचा आहे. 'त्या दिवशी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, कोणाला काय हरकत आहे का? हा भाजपाने धर्माचा ठेका घेतला आहे का? मी पण बिसबिसुआचा ब्राह्मण आहे. मी माझ्या बायकोशी विनोद करतो, इतर कोणाला यावर भाष्य करण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल करत ते विधान वैयक्तिक टिप्पणी असल्याचे अमिताभ वाजपेयी यांनी सांगितले.