म्यानमार बॉर्डर सील; आता घुसखोरी थांबणार, गृहमंत्रालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:56 AM2024-02-09T09:56:42+5:302024-02-09T09:57:04+5:30
लोकांचा मुक्त वावर रोखण्यासाठी गृहमंत्रालयाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारत व म्यानमार या उभय देशांदरम्यान मुक्त वावरासाठी घेतलेला फ्री मूव्हमेंट रेजिमचा (एफएमआर) निर्णय रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केली. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवरील लोकांचा मुक्त वावर बंद झाला आहे. भारताची अंतर्गत सुरक्षा व म्यानमारला लागून असलेल्या ईशान्येच्या राज्यांची लोकसंख्याविषयक संरचना कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.
गृहमंत्री म्हणाले की, एफएमआर तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने केली होती. त्यानुसार परराष्ट्र खात्याने पुढील प्रक्रिया सुरू केली. भारत-म्यानमार सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या प्रदेशात १६ किमी अंतरापर्यंत जाण्याची
परवानगी एफएमआरमुळे देण्यात आली होती. देशाच्या सीमा सुरक्षित असाव्यात, यासाठी पंतप्रधान दक्ष आहेत. त्याच भूमिकेतून एफएमआरबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सीमेवर संपूर्ण भागात कुंपण
भारत व म्यानमार या दोन देशांमधील सीमेवर संपूर्ण भागात कुंपण उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जाहीर केला होता.
तसेच या सीमेवर गस्त घालण्याकरिता व टेहळणीसाठी कुंपणालगत एक रस्ताही बांधण्याचा विचार आहे. दोन देशांच्या सीमेलगत अरुणाचल प्रदेश, मणिपूरमधील एक किमी परिसरात कुंपण घालण्याचे काम सुरू झाले आहे.
बॉर्डर सीलचा निर्णय का?
म्यानमारमध्ये बंडखोर गट व लष्कर यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. नोव्हेंबरपासून आतापर्यंत ६०० सैनिक भारतात घुसले होते. मिझोराम सरकारने यासंदर्भात केंद्राकडे मदत मागितली होती. जानेवारीमध्ये म्यानमारमधून पळून आलेल्या सैनिकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला होता.
काय आहे एफएमआर?
nभारत आणि म्यानमारमध्ये १६०० किमी लांबीची सीमा आहे. १९७० मध्ये दोन्ही देशांमध्ये मुक्त हालचालीबाबत करार
झाला होता.
nयाला फ्री मूव्हमेंट रेजिम म्हणजेच ‘एफएमआर’ असे म्हणतात. त्याचे शेवटचे २०१६ मध्ये नूतनीकरण करण्यात आले.
nयामुळे दोन्ही देशांतील लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या प्रदेशाला भेट देता येत होती.
तक्रार काय?
nम्यानमारमधील दहशतवादी सीमा ओलांडून भारताच्या हद्दीत येतात, अशी तक्रार मणिपूरमधील मैतेई जमातीने केली होती.
nदेशांच्या सीमेवर कुंपण नसल्याचा फायदा घेऊन हे दहशतवादी भारतात अमली पदार्थांची तस्करी करतात, असाही दावा करण्यात आला होता.