मायलेकाच्या हत्येने मेरठमध्ये दहशत, आधी पतीचीही झाली होती हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 01:35 AM2018-01-26T01:35:55+5:302018-01-26T01:36:24+5:30
आॅक्टोबर, २०१६मध्ये निचित्तर कौर यांच्या पतीच्या झालेल्या हत्येचे निचित्तर कौर व बालमेंद्र हे साक्षीदार होते व या खटल्यात न्यायालयात साक्ष द्यायला ते जाणार होते, असे समजते. दुहेरी हत्येने गावात भीती आणि दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थ दुहेरी हत्येबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत.
मेरठ : तीन इसमांनी आई आणि मुलाची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर मेरठ जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निचीत्तर कौर (६०) या महिलेची घराबाहेर ३० सेकंदांत ८ गोळ्या घालून हत्या केली. त्या आधी मारेक-यांनी घराजवळ त्यांचा मुलगा बालमेंद्र (२८) याचीही हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
कौर यांच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमे-यात कौर यांच्या हत्येची घटना टिपली गेली आहे. बालमेंद्र कारने मेरठ शहराकडे येत असताना मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी कार त्याच्या घरापासून सुमारे ८०० मीटर्सवर अडवली आणि त्यांनी त्याच्यावर बेछूट गोळ््या झाडल्या. त्यात तो जागीच ठार झाला. त्यानंतर मारेक-यांनी घरी येऊन बालमेंद्रच्या आईवरही गोळ्या झाडल्या.
आॅक्टोबर, २०१६मध्ये निचित्तर कौर यांच्या पतीच्या झालेल्या हत्येचे निचित्तर कौर व बालमेंद्र हे साक्षीदार होते व या खटल्यात न्यायालयात साक्ष द्यायला ते जाणार होते, असे समजते. दुहेरी हत्येने गावात भीती आणि दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थ दुहेरी हत्येबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत.
सहायक पोलीस अधीक्षक मंजिल सैनी यांनी घटनास्थळी भेट दिली असून, मारेक-यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले. बालमेंद्रच्या पत्नीने या हत्येसंदर्भात सोखरा खेड्यातील तीन जणांविरुद्ध तक्रार दिली, असे त्यांनी सांगितले.