"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 12:33 PM2024-10-13T12:33:36+5:302024-10-13T12:39:11+5:30
रेल्वे दुर्घटनेनंतर केंद्रीय मंत्री ललन सिंह यांचं मोठं विधान समोर आले असून, त्यांच्या विधानानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
तिरुवल्लूरमध्ये ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक झाली. यावेळी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली, तर १२ ते १३ डबे रुळावरून घसरले. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेनंतर केंद्रीय मंत्री ललन सिंह यांचं मोठं विधान समोर आले असून, त्यांच्या विधानानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री ललन सिंह म्हणाले की, बिहारमध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी आम्ही माता राणीकडे प्रार्थना करतो. बिहारमध्ये गेल्या २०-२२ वर्षांपासून जशी परस्पर बंधुभावाची भावना आहे, तशीच कायम राहो. तसेच रेल्वे अपघाताबाबत ते म्हणाले की, रेल्वे अपघात तर होतच राहतात. हे अपघात जाणीवपूर्वक होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत रेल्वे मंत्रालय चौकशी करत असून लवकरच कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे.
म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. शुक्रवारी सायंकाळी कवरपेट्टई रेल्वे स्थानकाजवळ ही भयंकर घटना घडली. या अपघातात १९ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर, अडकलेल्या प्रवाशांना बसने पोनेरी येथे नेण्यात आले आणि नंतर दोन ईएमयू विशेष गाड्यांद्वारे चेन्नई सेंट्रलला नेण्यात आले.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये शुक्रवारी ताशी ७५ किलोमीटर वेगाने धावणारी एक्स्प्रेस ट्रेन मेन लाईवर जाण्याऐवजी लूप लाईनमध्ये घुसली आणि उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून एका डब्याला आग लागली आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच ते बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.