केसगळतीला कंटाळून विद्यार्थिनीची नदीत उडी घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 01:07 PM2018-09-03T13:07:03+5:302018-09-03T13:07:29+5:30
कोणाला कधी कोणत्या कारणांमुळे नैराश्य येईल आणि त्यातून अगदी आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला जाईल, याबाबत हल्ली काहीही सांगता येत नाही. अशीच एक मन हादरवणारी घटना म्हैसूर येथे घडली आहे.
नवी दिल्ली - कोणाला कधी कोणत्या कारणांमुळे नैराश्य येईल आणि त्यातून अगदी आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला जाईल, याबाबत हल्ली काहीही सांगता येत नाही. अशीच एक मन हादरवणारी घटना म्हैसूर येथे घडली आहे. हेअर स्टाइलमध्ये बदल केल्यानंतर केसगळतीची समस्या सुरू झाली म्हणून निराश झालेल्या म्हैसूरमधील एका विद्यार्थिनीनं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी विद्यार्थिनी बीबीएचा अभ्यास शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिनं म्हैसूरमधील एका पार्लरमधून हेअर स्टाइलमध्ये बदल केला. यानंतर काही दिवसांनी केसगळतीची समस्या उद्भवली. आपल्या डोक्यावर आता एकही केस राहणार नाही की काय?, अशी भीती तिला भेडसावू लागली. केसगळतीच्या समस्येमुळे ती निराश झाली आणि चक्क तिनं जीवनयात्राच संपवली.
आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या आई-वडिलांनी पार्लरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नेहा गंगमा असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. नेहा ही गंगमा दाम्पत्याची एकुलती एक मुलगी. नेहाच्या आईनं पोलिसांनी सांगितले की, केसगळतीच्या समस्येबाबत नेहानं फोनवर माहिती दिली होती. नवीन हेअर स्टाइलमुळे तिच्या केसांचा पोत बिघडला होता. यामुळे तणावात असलेल्या नेहानं कॉलेजमध्येही जाणं बंद केलं होतं. हेअर ट्रिटमेंटमुळे त्वचेची अॅलर्जीदेखील झाल्याचा आरोप नेहाच्या आईनं केला आहे.
नेहाच्या आत्महत्येसंदर्भात पोलिसांनी सांगितले की, नेहा म्हैसूर येथे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. 28 ऑगस्टला ती कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली ती घरी परतलीच नाही. नेहा घरी न आल्यानं तिच्या पीजीनं पोलिसांना याबाबतची माहिती दिली. कोडागू येथील रहिवासी असलेल्या नेहाच्या आईवडिलांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. शोध सुरू असताना 1 सप्टेंबरला पोलिसांना नेहाचा मृतदेह लक्ष्मण तीर्थ नदीजवळ सापडला. केसगळतीच्या समस्येमुळे नेहानं 28 ऑगस्टला नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी नेहाच्या मृतदेहाचे केस आणि अन्य नमुने तपासणीसाठी घेतले असून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.