एएन 32 चे रहस्यमयी अपघात; यापूर्वीची 2 विमाने अद्याप बेपत्ताच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 07:41 PM2019-06-13T19:41:35+5:302019-06-13T19:42:09+5:30
3 जूनला झालेल्या अपघातातील विमानाचे अवशेष शोधण्यासाठी भारताची तिनही सैन्यदले प्रयत्न करत होती.
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हवाई दलाच्या 13 जवानांना नेणारे मालवाहू विमान अरुणाचलच्या डोंगररांगांमध्ये गायब झाले होते. मात्र, युद्धस्तरावर शोध घेतल्यानंतर हे विमान भारतीय सैन्याला सापडले असून 13 जण शहीद झाले आहेत. एएन 32 हे विमान गायब होण्याचे प्रकार या आधीही भारतासोबत घडले आहेत. मात्र, या प्रकारामागचे कारण शोधण्यास अपयश आले आहे.
3 जूनला झालेल्या अपघातातील विमानाचे अवशेष शोधण्यासाठी भारताची तिनही सैन्यदले प्रयत्न करत होती. यापूर्वीही दोन विमाने गायब झाली असून अद्याप या विमानांचा शोध लागलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या विमानाचे अवशेष ज्या भागात मिळाले आहेत त्या भागात या आधीही अनेकदा विमानांचे अवशेष सापडलेले आहेत. यामध्ये दुसऱ्या विश्व युद्धातील विमानांची संख्या जास्त आहे.
1986 मध्ये गायब झालेले पहिले विमान
एएन-32 च्या गायब होण्याची पहिली घटना 25 मार्च 1986 मध्ये घडली. सोव्हियत युनियन आणि ओमानच्या वाटेने हे विमान भारतात येत होते. हिंदी महासागरावर असताना हे विमान गायब झाले. या विमानामध्ये सातजण होते. आजपर्यंत या विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही.
2016 मध्ये दुसरी घटना
जुलै 2016 मध्ये बंगालच्या खाडीवरून एएन-32 चे दुसरे विमान गायब झाले होते. या विमानामध्ये 29 जण प्रवास करत होते. भारतीय हवाई दलाने महिनाभर शोध घेतला होता. मात्र, याही विमानाबाबत काही पत्ता लागला नाही.
नुकतीच झालेली विमान दुर्घटना ही तिसरी होती. मात्र, या विमानाचे अवशेष मिळाल्याने हवाई दलाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. एएन-32 याच विमानाच्या बाबतीत या घटना का होतात याचे उत्तर कोणाकडेच नाही.