G20 वेळी चीनच्या रहस्यमय बॅगमुळे उडाली तारांबळ, तब्बल १२ तास तणाव; काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 10:51 AM2023-09-13T10:51:39+5:302023-09-13T10:52:31+5:30
रुम विजिटवेळी खोलीत गेलेल्या एका स्टाफ मेंबरने बॅगेत काही संशयास्पद वस्तू असल्याची माहिती दिली.
नवी दिल्ली – जी २० कार्यक्रमाच्या सांगता करतेवेळी गुरुवारी अजब प्रकार समोर आला. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली. या प्रकारामुळे गुप्तचर यंत्रणांचाही काही काळ गोंधळ उडाला. हॉटेल ताज पॅलेसमध्ये चीनहून आलेल्या शिष्टमंडळाच्या एका सदस्याने एक बॅग आणली होती. पोलिसांनी जेव्हा या बॅगची तपासणी करायला सांगितली तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. खूप वेळ सुरक्षा रक्षकांनी चीनी व्यक्तीची समजूत काढली. बॅग चेक करणे आवश्यक असल्याचे सांगितले परंतु त्याने काही ऐकले नाही.
बॅग चेक करण्यावरून सुरक्षा रक्षक आणि चीनी व्यक्तीमध्ये गोंधळ झाला. त्यानंतर तो चीन एम्बेसीमध्ये परतला. पोलिसांच्या माहितीनुसार, या व्यक्तीनंतर जो कुणी व्यक्ती आले त्यांच्या सगळ्यांच्या बॅगा चेक केल्या गेल्या. परंतु त्या चीनी व्यक्तीच्या बॅगमध्ये काय आहे हे स्पष्ट झाले नाही. ही बॅग इतर सामानाच्या साईजपेक्षा मोठी होती. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना संशय आला. परंतु डिप्लोमेटिक प्रोटोकॉल लक्षात घेता सुरक्षा रक्षकांनी ही बॅग आतमध्ये घेऊन जायला परवानगी दिली.
चीनी लोकांनी का मागितले प्रायव्हेट इंटरनेट
रुम विजिटवेळी खोलीत गेलेल्या एका स्टाफ मेंबरने बॅगेत काही संशयास्पद वस्तू असल्याची माहिती दिली. हा मेसेज सुपरवायझरपर्यंत पोहचला. त्यानंतर तात्काळ सर्व टीम अलर्ट झाल्या. ही बॅग स्कॅन करायला सांगितली. त्यानंतर वातावरण तापले होते. चीनी सदस्य त्यांच्या बॅगा आणि त्यातील सामान चेक करण्यास नकार देत होते. जवळपास १२ तास तणाव कायम होता. अखेर संशयास्पद बॅग चीनी दूतावासाकडे पाठवण्यास ते तयार झाले. प्रायव्हेट इंटरनेट मागितले परंतु ते हॉटेलने नाकारले.
त्याच हॉटेलमध्ये थांबले होते ब्राझीलचे राष्ट्रपती
चीनी सूटकेसचे अखेरपर्यंत रहस्य बनून राहिले. हॉटेल सूत्रांनुसार, चीनी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हॉटेलमधून संशयास्पद गोष्टी हटवणे आणि त्या दूतावासाकडे पाठवणे यावर सहमती झाल्याने प्रकरण निवळलं. विशेष म्हणजे जी २० शिखर संमेलनासाठी येणारे ब्राझीलचे राष्ट्रपती याच हॉटेलमध्ये थांबले होते.
काय आहे सर्विलांस सेटअप?
ताज पॅलेसच्या सुरक्षेत सहभागी सूत्रांनी सांगितले की, चीनी लोकांनी काही उपकरणे तपासणीपासून रोखली होती. परंतु भारतीय सुरक्षा टीमने तपासणीवर भर दिला. ३ सदस्यीय सुरक्षा जवानांना चीनी लोकांच्या खोलीबाहेर १२ तास देखरेख ठेवावी लागली. त्यानंतर ती उपकरणे चीनी दूतावासांकडे पाठवण्यात आली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत जी २० शिखर संमेलनाला आले नाहीत. त्यांच्याजागी पंतप्रधान ली कियांग पोहचले होते.