आंध्र प्रदेशमध्ये पसरतोय रहस्यमय आजार, एका रात्रीत सापडले १४० रुग्ण
By बाळकृष्ण परब | Published: December 7, 2020 07:46 AM2020-12-07T07:46:56+5:302020-12-07T22:59:17+5:30
Andhra Pradesh News : देशात कोरोनाच्या फैलावाचे सत्र सुरू असतानाच आता आंध्र प्रदेशमधील एलरू शहरात एक रहस्यमय आजार पसरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अमरावती (आंध्र प्रदेश) - देशात कोरोनाच्या फैलावाचे सत्र सुरू असतानाच आता आंध्र प्रदेशमधील एलरू शहरात एक रहस्यमय आजार पसरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रहस्यमय आजारामुळे लोक मोठ्या प्रमाणात बाधित होत असून, काल एका रात्रीत सुमारे १४० रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, हा नेमका कोणता आजार आहे. याचा उलगडा डॉक्टरांनाही झालेला नाही.
चिंताजनत बाब म्हणजे रुग्णांची संख्या वाढण्यामागचे कारण डॉक्टरांनाही कळलेले नाही. गेल्या शनिवारी एलुरू शहरात चक्कर आणि मळमळ या लक्षणांनंतर मुलांसह एकूण १८ जण बेशुद्ध झाले होते. मात्र आजारी पडल्यानंतर काही क्षणा्ंतच ते बरे झाले होते. वन-टाऊन क्षेत्रात अचानक घडलेल्या या घटनेनंतर कुठलातरी रहस्यमय आजार पसरल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली होती.
Number of people falling sick in Eluru is increasing. From last night to this morning around 140 persons were admitted & discharged. Symptoms include nausea & fainting. Reason for sudden increase is not yet known: Dr Mohan, Superintendent of Eluru Govt Hospital #AndhraPradeshpic.twitter.com/RSWN7rQE1K
— ANI (@ANI) December 6, 2020
दरम्यान, या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री (आरोग्य) एकेके श्रीनिवास यांनी याबाबत माहिती दिली आहे. एलुरू शहरातील सर्व परिस्थिती सामान्य आहे तसेच घाबरण्यासारखे काही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काही जणांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. संबंधित रुग्णांचे सिटीस्कॅन करण्यात आले असून, त्यामध्ये सर्व काही सामान्य असल्याचे दिसून आल्याचे पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे संयुक्त जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांनी सांगितले. तसेच हा प्रकार विषाणूजन्य संसर्गाचा असू शकतो, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.
या आजाराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीनिवास यांनी रविवारी सांगितले की, पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरू शहरात स्थानिक सरकारी रुग्णालयांमध्ये चक्कर आणि मिर्गी येत असल्याची तक्रार केल्यानंतर काही रुग्णांना भरती करण्यात आले होते. मात्र आता तेथील परिस्थितीत नियंत्रणात आहे. रुग्णांना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून, आता सर्वजण सुरक्षित आहेत.