रहस्यमय...! डॉक्टरांवर हल्ल्यासाठी ७००० गुंड कुठून आले? कोण फुड डिलीव्हरी करतो, कोण कॅब ड्रायव्हर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 15:36 IST2024-08-17T15:35:50+5:302024-08-17T15:36:28+5:30
देशभरात आंदोलने होत असताना त्या हॉस्पिटलच्या आंदोलनाला बसलेल्या डॉक्टरांवर १४ ऑगस्टच्या रात्री हल्ला करण्यात आला होता.

रहस्यमय...! डॉक्टरांवर हल्ल्यासाठी ७००० गुंड कुठून आले? कोण फुड डिलीव्हरी करतो, कोण कॅब ड्रायव्हर...
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात रोज मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. या घटनेच्या विरोधात देशभरात आंदोलने होत असताना त्या हॉस्पिटलच्या आंदोलनाला बसलेल्या डॉक्टरांवर १४ ऑगस्टच्या रात्री हल्ला करण्यात आला होता. तसेच हॉ़स्पिटलची मोडतोडही करण्यात आली होती. या जमावाला कोणी, कशासाठी आणले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
डॉक्टरांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमाव आला होता. पोलिसांनुसार हे ६ ते ७ हजार लोक होते. कोलकाता पोलीस सीसीटीव्हीच्या आधारावर या हल्लेखोरांची ओळख पटवत आहे. यामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका महिलेसह २५ जणांची ओळख पटली असून पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले आहे.
हॉस्पिटलच्या बाहेर गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांन अटक केल्यांमध्ये कॅब ड्रायव्हर, डिलिव्हरी बॉय आणि अनेक बेरोजगार तरुण होते, असे समोर आले आहे. पोलिसांनुसार हे तरुण हॉस्पिटलच्या आजुबाजुच्या वस्त्यांमध्ये राहत आहेत. पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतल्याचे जरी सांगितले असले तरी स्थानिक लोकांनुसार अनेकांना त्यांनी उचलले असल्याचे म्हटले आहे.
अटकेतील आरोपीपैकी अनेकजण घरात पहाटे कँडल मार्चसाठी जात असल्याचे सांगितले होते. काही तरुण टीएमसीच्या कार्यकर्त्यांसोबत उठबस करायचे, परंतू अनेकांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता असे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. हे लोक एवढ्या मोठ्या संख्येने कसे काय एकत्र आले, त्यांना कोणी एकत्र आणले, त्यांना डॉक्टरांवर हॉस्पिटलवर हल्ला करण्याच्या सूचना कोण देत होते, हा प्रश्न आता पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे.