म्हैसूर विमानतळाचे नाव 'टिपू सुलतान'? काँग्रेसच्या मागणीमुळे सभागृहात गोंधळ, भाजपाचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:12 PM2023-12-16T12:12:20+5:302023-12-16T12:15:53+5:30
Mysuru airport : विमानतळाचे नामकरण टिपू सुलतान करण्याच्या प्रस्ताव ठेवल्यानंतर भाजपा आमदारांनी सभागृहात उभे राहून विरोध केला.
बंगळुरू : टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून कर्नाटकात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. या मुस्लिम शासकाबद्दल वेळोवेळी वाद निर्माण होतात. दरम्यान, म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या काँग्रेस आमदार प्रसाद अब्बय्या यांच्या मागणीवरून नवा वाद सुरू झाला आहे. भाजपा आमदारांनी विधानसभेत चांगलाच गदारोळ केला.
विमानतळाचे नामकरण टिपू सुलतान करण्याच्या प्रस्ताव ठेवल्यानंतर भाजपा आमदारांनी सभागृहात उभे राहून विरोध केला. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला. यानंतरही कर्नाटक विधानसभेने केंद्र सरकारला प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर चार विमानतळांचे नाव देण्याचे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे. यामध्ये हुबळी विमानतळाला क्रांतिवीर सांगोली रायण्णा, बेलागावी विमानतळाचे नाव कित्तूर राणी चेन्नम्मा, शिवमोग्गा विमानतळाचे नाव राष्ट्रकवी डॉ. के.व्ही. पुट्टप्पा (कुवेंपू) आणि विजयपुरा विमानतळाला जगद्ज्योती बसवेश्वरांचे नाव देण्यात येणार आहे.
सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील मंत्री एम बी पाटील यांनी स्पष्ट केले की, विमानतळांसाठी प्रस्तावित नवीन नावे केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर केली जातील. मात्र, केंद्र सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हैसूर विमानतळाचे 'टिपू सुलतान विमानतळ'मध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे 2016 मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांनी 10 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांचा वाढदिवस 'टिपू जयंती' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, 2019 मध्ये भाजपाची सत्ता आल्यावर हा उत्सव बंद झाला.
दरम्यान, या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कर्नाटकात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आणि सिद्धरामय्या पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा, कर्नाटकातील माजी संस्थानाची राणी (ज्याने ब्रिटिशांविरुद्ध बंड केले) आणि टिपू सुलतान यांचा 'स्वाभिमानासाठी लढण्यासाठी प्रेरणा' म्हणून उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी कित्तूर चन्नम्मा यांच्या ब्रिटीश सैन्याला तोंड देताना दाखवलेल्या शौर्याबद्दल चर्चा केली आणि त्यांचे शौर्य आणि तत्त्वे साजरे करण्याच्या मागील पुढाकाराचे कौतुक केले.