‘…तर 2024ची निवडणूक माझी शेवटची असेल’, चंद्रबाबू नायडू यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 06:35 PM2022-11-17T18:35:34+5:302022-11-17T18:35:43+5:30
तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मोठे विधान केले आहे.
कुर्नूल:तेलगू देसम पार्टीचे (TDP) अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी त्यांच्या भविष्याबाबत एक मोठे विधान केले हे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष सत्तेवर आला नाही, तर 2024 ची निवडणूक त्यांची शेवटची असेल, असे वक्तव्य त्यांनी केले. आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे एका रोड शोमध्ये ते बोलत होते.
यावेळी त्यांनी, टीडीपी सत्तेत येईपर्यंत विधानसभेत पाऊल न ठेवण्याच्या आपल्या संकल्पाचीही आठवण करुन दिली. 'मला विधानसभेत जायचे असेल, राजकारणात राहायचे असेल आणि आंध्र प्रदेशला न्याय द्यायचा असेल, तर पुढच्या निवडणुकीत तुमची साथ हवीये. आमचा विजय न झाल्यास ही माझी शेवटची निवडणूक असू शकते. तुम्ही मला आशीर्वाद द्याल का? तुमचा माझ्यावर विश्वास आहे का?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला विचारला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील वायएसआर काँग्रेसवर सभागृहात त्यांच्या पत्नीचा अपमान केल्याचा आरोप केला. दरम्यान, 19 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी शपथ घेतली होती की, सत्तेत परतल्यानंतरच ते आंध्र प्रदेश विधानसभेत प्रवेश करतील. यावेळी रोड शो दरम्यान लोकांना आपल्या शपथेची आठवण करून देत नायडू म्हणाले की, जर ते सत्तेवर आले नाहीत, तर पुढची निवडणूक त्यांची शेवटची असेल.