Video: नाद खुळा... म्हणून झोमॅटो बॉय थेट घोड्यावरुन ग्राहकाच्या दारात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:57 PM2024-01-03T18:57:28+5:302024-01-03T19:14:38+5:30
केंद्र सरकारच्या 'हिट अँड रन' संदर्भातील नवीन कायद्याला विरोध करत ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत.
देशभरातील ट्रकचालकांनी बेमुदत संप पुकारल्याने पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा कमी उपलब्ध झाला. तर, अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरल्याने बहुतांश पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लावल्या होत्या. यादरम्यान, ऑनलाईन ऑर्डर पाठवणाऱ्या डिलीव्हरी बॉयची चांगलीच गोची झाली. ग्राहकांपर्यत वेळेत ऑर्डर पोहोचवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. यावेळी, एका झोमॅटो बॉयने चक्क घोड्यावर स्वार होऊन डिलिव्हरी पोहोचवली.
केंद्र सरकारच्या 'हिट अँड रन' संदर्भातील नवीन कायद्याला विरोध करत ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रक आणि टँकर चालकांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे, सोमवारपासून गाड्या एकाच जागेवर उभ्या होत्या. पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा करणारे काही टँकरही संपात सहभागी झाले होते, त्यामुळे, पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला. यावेळी, वाहनधारकांच्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल झाला असून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने आपली ऑर्डर सेवा देण्यासाठी चक्क घुडसवारी केल्याचं पाहायला मिळालं.
हाती घोडाची दोर आणि पाठीवर झोमॅटोची बॅग घेऊन रस्त्यावरुन धावणारा घोडा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. घोड्यावरुन झोमॅटोची डिलिव्हरी नेमकी कोणाला जात आहे, असा विचारही अनेकांच्या मनात आला. तसेच, यामागचे नेमके कारण काय आणि यातून काय मागवले असावे, असेही प्रश्न काहींच्या मनात होते. संबंधित घटना तेलंगणातील हैदराबादची असून झोमॅटो बॉयच्या दुचाकीतील पेट्रोल संपले होते. त्यामुळे, त्याने स्वत:ची बाईक तिथेच सोडून दिली व घोड्यावरुन डिलिव्हरी देण्यास पळाला.
हैदराबादच्या चंचलगुडा येथील हा व्हिडिओ आहे, घोड्यावरुन झोमॅटोची डिलिव्हरी होत असल्याचं पाहून रस्त्यावरील बघ्यांनीच हा व्हिडिओ बनवला आहे. विशेष म्हणजे डिलिव्हरी बॉयनेही हात उंचावून बघ्यांना अभिवादन केले. याचदरम्यान, एका व्यक्तीशी बोलताना त्याने वाहनातील पेट्रोल संपल्याने आपण घोड्यावरुन डिलिव्हरी देण्यासाठी जात असल्याचं त्याने म्हटलं. दरम्यान, हा बॉय जवळपास तीन तास पेट्रोल पंपावरील रांगेत उभा होता. पण, पेट्रोल न मिळाल्याने त्याने हा पर्याय निवडला.