Nab Das: पाच प्रमुख नेत्यांवर प्राणघातक हल्ले! हत्या झालेले नब दास पहिले कॅबिनेट मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 06:10 AM2023-01-31T06:10:14+5:302023-01-31T06:10:41+5:30
Nab Das: ओडिशाचे आरोग्यमंत्री नब किशोर दास यांची रविवारी हत्या झाली. हत्या झालेले ते पहिले ओडिशाचे कॅबिनेट मंत्री आणि दुसरे आमदार ठरले.
- अंबिका प्रसाद कानुनगो
भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्यमंत्री नब किशोर दास यांची रविवारी हत्या झाली. हत्या झालेले ते पहिले ओडिशाचे कॅबिनेट मंत्री आणि दुसरे आमदार ठरले. सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपाल दास याने रविवारी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाने (बीजेडी) भूतकाळात त्यांच्या नेत्यांवर गोळीबाराच्या आणखी दोन घटना पाहिल्या आहेत. पक्षाच्या एका युवा नेत्याचीही हत्या करण्यात आली. राज्यात काँग्रेस नेते आणि झामुमोचे माजी खासदार यांच्यावरही हल्ला झाला होता.
दास यांच्यावर अंत्यसंस्कार
पश्चिम ओडिशाचे लोकप्रिय नेते नब किशोर दास यांचे पार्थिव भुवनेश्वर येथून त्यांच्या मूळ गावी झारसगुडा येथे आणण्यात आल्यानंतर हजारो लोकांनी सोमवारी त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ओडिशा सरकारने रविवारी संध्याकाळी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता.
राज्यात असे झाले नेत्यांवर हल्ले...
२२ फेब्रुवारी २०१४ : राज्याचे तत्कालीन पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश्वर मोहंती एका कार्यक्रमातून घरी परतत असताना हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यांच्या डाव्या हाताला आणि पाठीला गोळ्या लागल्या. सुदैवाने ते बचावले.
सप्टेंबर २०११ : नबरंगपूर जिल्ह्यातील रायघर ब्लॉक येथे तीन अज्ञात व्यक्तींनी व्हीलचेअरवर बसलेले बीजेडी आमदार जगबंधू माझी आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी (पीएसओ) यांची हत्या केली.
१५ डिसेंबर २०१३ : विद्यमान वाणिज्य आणि वाहतूक मंत्री तुकुनी साहू यांचे पती अभिमन्यू साहू हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता, काही बदमाशांनी त्यांची गळा चिरून हत्या केली होती.
२६ फेब्रुवारी २००७ : काँग्रेस आमदार धनुरजय सिद्धू यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. पळून जाण्यापूर्वी गुन्हेगारांनी सुमारे १४ राउंड गोळीबार केला. शस्त्रक्रिया करून त्यांच्या गोळ्या काढण्यात यश आल्याने ते बचावले.
२००९ : माजी खासदार सुदाम मरांडी फुटबॉल सामन्यात सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. यात ते बचावले; पण त्यांचे तीन कर्मचारी ठार झाले.