नबी यूपी, तर कमलनाथ हरियाणा, पंजाबचे प्रभारी
By admin | Published: June 14, 2016 04:28 AM2016-06-14T04:28:01+5:302016-06-14T04:28:01+5:30
उत्तर प्रदेशात आणि पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि हरियाणात राज्यसभा निवडणुकीमध्ये फुटलेली आमदारांची मते या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन्ही
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आणि पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि हरियाणात राज्यसभा निवडणुकीमध्ये फुटलेली आमदारांची मते या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन्ही राज्यांची जबाबदारी आता अनुक्रमे गुलाब नबी आझाद आणि कमलनाथ यांच्याकडे सोपवली आहे.
गुलाब नबी आझाद हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, तर कमलनाथ हे सतत नऊ वेळा मध्य प्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेले आहेत. हे दोन्ही नेते गांधी परिवाराचेही कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
कमलनाथ यांच्याकडे हरियाणाबरोबरच पंजाबचीही सूत्रे देण्यात आली आहेत. त्या राज्यातही पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, तिथे काँग्रेसला विजयाची शक्यता वाटत आहे. काँग्रेसने या दोन राज्यांतील पक्षाची रणनीती ठरवण्याचे काम प्रशांत किशोर यांच्याकडे सोपवले असून, त्यांच्या सल्ल्यानेच दोन्ही नेत्यांकडे वरील राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येते. पंजाबमध्ये अकाली दल-भाजपा सरकार असून, त्या सरकारविषयी लोकांमध्ये रागाचे वातावरण आहे. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न काँग्रेस व आम आदमी पार्टी करीत आहेत. त्यामुळे या दोन पक्षांतच सामना होईल, अशीही चर्चा सुरू आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भाजपाला काँग्रेसची भीती, त्यामुळेच खटले सुरू केले
काँग्रेसची पंजाबमधील रणनीती लक्षात घेत, त्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी केंद्र सरकारने १९८४ सालच्या शीख दंगलीतील खटले पुन्हा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दंगलीत कमलनाथ यांच्यासह अनेक नेत्यांची नावे घेतली गेली होती. मात्र, दंगलींची चौकशी करणाऱ्या नानावटी आयोगाने आपणास निर्दोष म्हणून जाहीर केले आहे. त्या दंगलीत आपणास अडकवण्याचा काहींनी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे दंगलींचे खटले पुन्हा सुरू केले, तरी त्यास आपण घाबरत नाही, असे कमलनाथ यांनी सांगितले. अकाली दल आणि भाजपाला काँग्रेसची भीती वाटत असल्यामुळेच, पुन्हा खटले सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याची टीकाही त्यांनी केली.
यूपीत उपयोग
गुलाब नबी आझाद हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून, उत्तर प्रदेशातील मुस्लीमबहुल मतदारसंघ पाहता, त्यांचा उपयोग करून घेण्याचे पक्षाने ठरविले आहे, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.