नागालँडच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:55 AM2017-07-20T01:55:01+5:302017-07-20T01:55:01+5:30
एकापाठोपाठच्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे नागालँडमधील राजकीय पेचाला बुधवारी नवीन वळण लागले. एकीकडे नागा पीपल्स फ्रंटचे नेते आणि सत्तारूढ
कोहिमा : एकापाठोपाठच्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे नागालँडमधील राजकीय पेचाला बुधवारी नवीन वळण लागले. एकीकडे नागा पीपल्स फ्रंटचे नेते आणि सत्तारूढ डेमोक्रेटिक अलायन्स आॅफ नागालँडचे अध्यक्ष टी.आर. झेलियांग यांचीच पुन्हा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागत त्यांचा शपथविधीही पार पडला. त्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा वेगवान राजकीय घडामोडी घडल्या असून, पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून झेलियांग यांची नागालँड पीपल्स फं्रट या पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त थडकले. एकीकडे राजकीय पेच संपुष्टात आल्याचे दिसत असताना या नव्या घडामोडीमुळे नागालँडमधील राजकीय पेच अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे.
झेलियांग यांनी नागालँड पीपल्स फ्रंट पक्षच संपविण्याचा डाव रचला आहे, असे नागालँड पीपल्स फ्रंटचे कार्याध्यक्ष हुस्का येपथोमी आणि अपाँग पाँगेनर यांनी सांगितले. तथापि, या निर्णयाने झेलियांग हे जराही विचलित झाले नाहीत. माझ्या हकालपट्टीने विधानसभा सदस्यत्वावर काहीही परिणाम होणार नसल्याचे मीच विधानसभेत पक्षाचा नेता असेन, असे त्यांनी ठाम शब्दांत स्पष्ट केले. तत्पूर्वी, राज्यपाल पी.बी. आचार्य यांनी झेलियांग यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करीत त्यांना २२ जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.