Nagaland firing incident: गोळीबारापूर्वी लष्कराने खातरजमा केली नाही; अहवालातून उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 06:56 AM2021-12-08T06:56:56+5:302021-12-08T06:57:20+5:30
अहवाल सादर : १४ नागरिकांच्या मृत्यूचे प्रकरण
कोहिमा : नागालँडच्या मोन जिल्ह्यात शनिवारी कामावरून पिकअप ट्रकमधून परत निघालेले नागरिक आहेत की अन्य कोणी याची लष्कराने त्यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी खातरजमा केली नाही, असे संयुक्त अहवालात म्हटले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक टी. जॉन लोंगकुमेर आणि आयुक्त रोविलातुवो मोर यांनी हा अहवाल तयार केला. गोळीबार घटनेच्या प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने हे दोन अधिकारी म्हणाले की, “लष्कराची विशेष दले ही ६ जणांचे मृतदेह गुंडाळून पिकअप व्हॅनमध्ये ठेवताना ग्रामस्थांना आढळले. हे मृतदेह त्यांच्या बेस कॅंपला नेण्याचा उद्देश होता.” ४ डिसेंबरच्या सायंकाळी ४.१० च्या सुमारास ८ ग्रामस्थ तिरू येथील कोळशाच्या खाणीत काम करून पिकअप व्हॅनने परत येत असताना सुरक्षादलांनी (आसामस्थित २१ पॅरा स्पेशल फोर्स) त्यांच्यावर गनिमी पद्धतीने हल्ला करून ठार मारले.
हॉर्नबिल महोत्सव रद्द : राज्यात सध्या सुरू असलेला हॉर्नबिल महोत्सव नागालँडच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी रद्द केला. सुरक्षादलांकडून १४ नागरिकांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ महोत्सव रद्द केला गेल्याचे सूत्रांनी म्हटले. १० दिवसांचा हा महोत्सव १ डिसेंबर रोजी सुरू झाला होता.