Nagaland Oath Ceremony : नागालँडच्या पहिल्या महिला आमदार बनल्या मंत्री, PM नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 04:05 PM2023-03-07T16:05:23+5:302023-03-07T16:05:58+5:30
Nagaland Oath Ceremony : या शपधविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते.
नागालँड विधानसभेत निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार सलहौतुओनुओ क्रूस यांनी मंगळवारी (७ मार्च) मंत्री म्हणून शपथ घेतली. नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (NDPP) नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेल्या सर्वपक्षीय सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिलाँगमध्ये शपथ घेतली. या शपधविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलहौतुओनुओ क्रुसे यांचे हात जोडून अभिनंदन केले. नागालँड विधानसभेत पहिल्यांदाच दोन महिला (सलहौतुओनुओ क्रुसे आणि हेकानी जखालू) विजयी झाल्या आहेत. नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या उमेदवार सलहौतुओनुओ क्रुसे यांनी पश्चिम अंगामी जागेवरून अपक्ष उमेदवाराचा सात मतांनी पराभव केला. तर दिमापूर-3 मतदारसंघातून नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या उमेदवार हेकानी जखालू विजयी झाल्या आहेत.
Nine MLAs including G Kaito Aye, Jacob Zhimomi, KG Kenye, P Paiwang Konyak, Metsubo Jamir, Temjen Imna Along, CL John, Salhoutuonuo Kruse and P Bashangmongba Chang take oath as ministers in the Nagaland cabinet pic.twitter.com/QyQnCsDBl2
— ANI (@ANI) March 7, 2023
नेफ्यू रिओ सलग पाचव्यांदा बनले मुख्यमंत्री
नेफ्यू रिओ यांनी सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते राज्यात सर्वपक्षीय सरकारचे नेतृत्व करत आहेत, याठिकाणी कोणताही विरोधी पक्ष नसणार आहे. टीआर झेलियांग, वाई पॅटन यांनी नागालँडचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल ला गणेशन यांनी रिओ मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना शपथ दिली.
'या' आमदारांनी घेतली शपथ
जी काइतो ऐ, जॅकब झिमोमी, केजी केन्ये, पी पैवांग कोन्याक, मेत्सुबो जमीर, तेमजेन इम्ना अलॉन्ग, सीएल जॉन, सलहौतुओनुओ क्रुसे आणि पी बाशांगमोंगबा चांग यांच्यासह 9 आमदारांनी नागालँड मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नुकत्याच झालेल्या नागालँड निवडणुकीत नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी-भाजप युतीने 60 पैकी 37 जागा जिंकल्या आहेत.