नागेश्वर राव प्रकरणातून सुप्रीम कोर्टाचे आणखी एक न्यायाधीश झाले बाजूला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:57 AM2019-02-01T05:57:25+5:302019-02-01T05:58:01+5:30
सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून एम. नागेश्वर राव यांची नेमणूक करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली आहे
नवी दिल्ली : सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून एम. नागेश्वर राव यांची नेमणूक करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. या याचिकेच्या सुनावणीतून न्या. एन.व्ही. रामणा यांनी स्वत:ला बाजूला केले आहे.
या प्रकरणातून अंग काढून घेणारे न्या. रामणा हे तिसरे न्यायाधीश आहेत. यापूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. ए.के. सिकरी यांनीही स्वत:ला या प्रकरणातून बाजूला राहण्याचे ठरविले होते.
न्या. रामणा यांनी म्हटले आहे की, नागेश्वर राव हे त्यांच्या गावचे रहिवासी आहेत आणि आपण राव यांच्या मुलीच्या विवाह समारंभात सहभागी झालो होतो. दरम्यान, सीबीआयच्या विशेष संचालकपदावरून दूर करून राकेश अस्थाना यांची नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरोच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयास आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.