उड्डाणपूल उभारण्यात नागपूरला सिंहाचा वाटा; केंद्राने दिले महाराष्ट्राला १५८० कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:14 AM2022-08-08T08:14:10+5:302022-08-08T08:14:34+5:30
बव्हंशी प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत किंवा मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होतील.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्रातील सर्व फ्लायओव्हर्स आणि ओव्हरब्रिज उभारण्याचे सर्व प्रकल्प २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १४ फ्लायओव्हर आणि ओव्हरब्रिज हाती घेतले आहे. बव्हंशी प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत किंवा मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होतील. या प्रकल्पास नागपूरला सिंहाचा वाटा मिळाला आहे. याची सुरुवात नागपूर-रायपूर फ्लायओव्हरने (खर्च ४४८.३२ कोटी, सात किलोमीटर लांबी) झाली आहे. महाराष्ट्रातील अशा १४ प्रकल्पांपैकी हा सर्वात मोठा फ्लायओव्हर आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नागपूर आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ परिसरापर्यंत चारपदरी फ्लायओव्हर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. ३१८ कोटी रुपये खर्चाच्या या फ्लायओव्हरची लांबी ४.७९ किलोमीटर आहे. नागपूरमध्ये आणखी एक फ्लायओव्हर दुमरी जंक्शन येथे नागपूर बायपास क्षेत्रात स्लीप सर्व्हिस रोडसह २३.७७ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारला जात आहे.
याशिवाय नागपूरमध्ये छत्तीसगड-महाराष्ट्र सीमा ते वैनगंगा पुलापर्यंत ४ पदरी प्रदूषण शमन संरचनेचे तीन प्रकल्प (खर्च ३६० कोटी) या मंत्रालयाने हाती घेतले आहेत.
२०२४ पूर्वी दहा प्रकल्प होतील पूर्ण
आकडेवारीतून मिळालेल्या माहितीनुसार दहा अन्य प्रकल्प २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विक्रमी वेळेत पूर्ण होतील. नितीन गडकरी यांचा नागपूर हा लोकसभा मतदार संघ आहे. ५३ क्रमांकांच्या राष्ट्रीय महामार्गावर कारंजा आणि गौरी इन येेथे तसेच ८४८ क्रमांकांच्या राष्ट्रीय महामार्गावरही वडपे-गोंदे विभागासह अन्य विभागातही फ्लायओव्हर उभारण्यात येत आहेत.