एनडीटीव्हीवरील बंदीचे नायडू यांनी केले समर्थन
By admin | Published: November 6, 2016 09:08 AM2016-11-06T09:08:24+5:302016-11-06T09:08:24+5:30
एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घालण्यात आलेल्या एक दिवसाच्या बंदीचा सर्वत्र निषेध होत असताना आणि हा प्रकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आघात आहे
चेन्नई - एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घालण्यात आलेल्या एक दिवसाच्या बंदीचा सर्वत्र निषेध होत असताना आणि हा प्रकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आघात आहे, अशी टीका होत असली त्यांचा केंद्र सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही. किंबहुना माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बंदीचे जोरदार समर्थन केले आहे. देशाची सुरक्षा लक्षात घेऊनच या वृत्त वाहिनीवर बंदी घालण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
एनडीटीव्हीवर बंदी घालून सरकार मागच्या दाराने आणीबाणी लादीत असून प्रसार माध्यमांना धमकावण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत नायडू म्हणाले की, रालोआ सरकारला माध्यमांच्या स्वातंत्र्याचा सर्वोच्च आदर आहे. अशा मुद्यांचे राजकारण केल्यास देशाच्या सुरक्षेवरच परिणाम होऊ शकतो. काही लोक देशात आणीबाणी सारखी स्थिती असल्याचा आरोप करीत आहेत. मला त्याचे आश्चर्य वाटते.
वृत्तवाहिनीवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे, असल्याचे आज मी वृत्तपत्रात वाचले. हे लोक असे कसे काय म्हणत आहेत. यापूर्वी वाहिन्यांवर किती वेळा बंदी घालण्यात आली, याची यादी मी देऊ का? एएक्सएनवर दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. एफटीव्हीवरही दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. याशिवाय एन्टर १0 वाहिनीवर एक दिवसाची, एबीएन आंध्रज्योतीवर सात दिवस, अल जझिरावर पाच दिवसांची बंदी घालण्यात आली होती.
नायडू म्हणाले की, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणीबाणीच्या काळ््या दिवसांबाबत बोलत आहेत. आणीबाणी काय आहे, हे तरी तुम्हाला माहिती आहे का? आज टीका करणारे देशात आणीबाणी लादली होती, तेव्हा काँग्रेसमध्ये होते. सरकारवर तसेच पंतप्रधानांवर टीका करण्यासाठी हे लोक संधीच शोधत असतात. (वृत्तसंस्था)
>बंदी आणीबाणीकडे नेईल
एनडीटीव्हीवरील बंदी देशाला दुसऱ्या आणीबाणीच्या दिशेने घेऊन जाईल, अशी टीका द्रमुक नेते एम. करुणानिधी यांनी केली. पक्षाचे मुखपत्र ‘मुरासोली’मध्ये लिहिलेल्या एका लेखात ९३ वर्षीय करुणानिधी यांनी म्हटले की, या बंदीने मला आणीबाणीची आठवण झाली आहे. केंद्र सरकार अशाच कारवाया करीत राहिले तर देशात पुन्हा आणीबाणी येईल.