शेतकामांनी नायगाव शिवार गजबजला

By Admin | Published: February 12, 2016 10:46 PM2016-02-12T22:46:05+5:302016-02-12T23:04:05+5:30

हंगाम सुगीचा : रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व कांदा काढणीस वेग

Naigaon shivar garnishes due to farming | शेतकामांनी नायगाव शिवार गजबजला

शेतकामांनी नायगाव शिवार गजबजला

googlenewsNext

हंगाम सुगीचा : रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व कांदा काढणीस वेग
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोर्‍यात रब्बी हंगामातील गहू, ज्वारीसह रांगडा कांदा काढणीस वेग आला आहे. विविध शेतीची कामे सुरू झाल्याने शेतशिवार माणसांच्या वर्दळीने फुलून निघाल्याचे चित्र आहे.
परिसरात गेल्या चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नव्हता. यावर्षी शेवटच्या चरणात बर्‍या झालेल्या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना लाभ झाला आहे. उशिराने झालेल्या पावसाने नद्या, बंधारे व विहिरींना थोड्याफार प्रमाणात पाणी आल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या तृणधान्य पिकांबरोबर विविध भाजीपालावर्गीय पिके घेता आली. तसेच रांगडा व उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकर्‍यांना शेतीतून फायदा होऊ शकला नाही. या परिसरात गतवर्षी कांद्याचे अत्यल्प पीक होते. यावर्षी कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी असल्याचे चित्र आहे.
सध्या दिवस मोठा होऊ लागला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका बसू लागला असून, रब्बी हंगामातील पिके काढणीस तयार होऊ लागले आहेत. कमी पाण्यावर येणारी ज्वारी, हरभरा, गहू काढणीस शेतकर्‍यांनी सुरुवात केली आहे. तसेच रांगडा कांदा काढणीस सुरुवात झाल्याने चटका देणार्‍या ऊन्हातही शेतीची कामे सुरू असल्याने शेतशिवार शेतकरी, शेतमजुरांनी फुलून गेल्याचे चित्र या परिसरात दिसू लागले आहे. (वार्ताहर)

चौकट - लागली उन्हाळ्याची चाहूल
मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होत जातो. त्यानंतर येणार्‍या रथ सप्तमीला सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावर उन्हाच्या तीव्रतेत वाढ होऊन थंडी गायब होते. यंदाही या निसर्गचक्राप्रमाणे वातावरणात बदल होत आहे. यावर्षी मात्र हिवाळ्यात अनेकदा ढगाळ हवामानाची शेतकर्‍यांना अनुभूती आली आहे. पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कीटकनाशके फवारणीसाठी अतिरिक्त खर्च करण्याची वेळ बळीराजावर आली. उन्हाचा चटका वाढल्याने पिके काढणीस आली असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

Web Title: Naigaon shivar garnishes due to farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.