नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर रात्रभर राजकीय घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 08:46 AM2017-07-27T08:46:46+5:302017-07-27T09:24:57+5:30
नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये बुधवारी संध्याकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं आहे.
पाटणा, दि. 27- नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये बुधवारी संध्याकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं आहे. नितीश कुमार यांचा राजीनामा, लालूप्रसाद यादव यांनी त्यानंतर नितीश कुमार यांच्यावर केलेले आरोप, विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच ट्विटरवरून त्यांचं केलेलं कौतुक, भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी दिलेला पाठिंबा तसंच सत्तास्थापनेची संधी मिळावी यासाठी आक्रमक झालेलं राष्ट्रीय जनता दल आणि त्यानंतर राज्यपालांकडून करण्यात आलेली नितीश कुमारांच्या शपथविधीची घोषणा, या सर्व घटना बिहारमध्ये रंगत असलेलं राजकीय नाट्य दाखविणाऱ्या आहेत.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी नितीश कुमार यांची इच्छा होती. पण दबावापुढे झुकायला ते तयार नव्हते. दोन दिवसांपूर्वी नितीश यांनी तेजस्वी यांची भेट घेऊन त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला होता. पण बुधवारी तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत, असं लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केलं. नितीश कुमार यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी संध्याकाळपासून नेमकं काय घडलं ?
- बुधवारी संध्याकाळी नितीश कुमार यांची संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत बैठक झाली.
- आमदारांसोबतच्या बैठकीनंतर नितीश कुमार राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्या भेटीसाठी राजभवानाकडे गेले होते.
- राज्यपालांच्या भेटीमध्ये नितीश कुमारांनी राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.
-राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं.
- नितीश कुमारांनी राजीनाम दिल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं.
- नितीश कुमार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर काहीवेळातच लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीश यांच्यावर गंभीर आरोप केले.
- दिल्लीत तेव्हा भाजपाच्या संसदीय मंडळाची सुरू होती.
- भाजपाच्या केंद्रीय समितीची बैठक झाली व यामध्ये बिहारमध्ये पुन्हा निवडणुका घेण्याबाबत होकारार्थी मतं मांडण्यात आली
- या बैठकीनंतर तासाभरात नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देण्याचा भाजपाने निर्णय घेतला.
- बिहार भाजपाकडून दिल्लीला राज्यातील राजकीय परिस्थितीचा अहवाल पाठवण्यात आला.
- जदयू आणि भाजपचे राज्यभरातील आमदार पाटण्यात दाखल व्हायला सुरूवात झाली.
- नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जदयू आणि भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली.
- बैठकीनंतर जदयू आणि भाजपच्या आमदारांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा असल्याच्या पत्रावर सह्या केल्या.
- त्यानंतर नितीश कुमार, सुशील मोदी राजभवनात दाखल झाले.
- राजभवनातून बाहेर पडल्यानंतर गुरूवारी सकाळी १० वाजता नितीश कुमारांचा शपथविधी होइल, अशी घोषणा सुशील कुमार मोदींनी केली.
- या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव राजभवनाकडे गेले होते.
- राज्यपालांना भेटून तेजस्वी यादव यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला
- गुरूवारी सकाळी 10 वाजता नितीश कुमार आणि सुशील मोदी शपथ घेणार.
- नितीश कुमार शुक्रवारी बहुमत सिद्ध करणार असल्याची सूत्रांची माहिती.
- भाजप-जदयूचे 13-13 मंत्री शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती.
- बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.