नजमा हेपतुल्ला, पुरोहित यांच्यासह चार नवे राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2016 06:58 AM2016-08-18T06:58:06+5:302016-08-18T06:58:06+5:30
भाजपाच्या चार ज्येष्ठ नेत्यांची बुधवारी राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील बनवारीलाल पुरोहित तसेच माजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचा समावेश आहे.
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
भाजपाच्या चार ज्येष्ठ नेत्यांची बुधवारी राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील बनवारीलाल पुरोहित तसेच माजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचा समावेश आहे. बनवारीलाल पुरोहित यांची आसामचे राज्यपाल म्हणून तर हेपतुल्ला यांची मणिपूरच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेपतुल्ला या षण्मुगनाथन यांची जागा घेतील. षण्मुगनाथन मेघालयचे राज्यपाल असून, त्यांच्याकडे मणिपूरचाही कार्यभार होता. नागालॅण्डचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्याकडे आसामचाही कार्यभार होता. राजस्थानातील व्ही. पी. सिंह बदनोरे यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने ते कप्तानसिंह सोलंकी यांच्याकडून पदभार स्वीकारतील. हरियाणाचे राज्यपाल सोलंकी यांच्याकडे पंजाबचाही कार्यभार होता. दिल्लीतील जगदीश मुखी यांची अंदमान आणि निकोबारच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. ते लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) ए. के. सिंग यांची जागा घेतील. के. रोसय्या (तामिळनाडू) आणि राम नरेश यादव (मध्यप्रदेश) यांचा कार्यकाळ अनुक्रमे ३१ आॅगस्ट आणि ८ सप्टेंबर रोजी संपत असून, तेव्हा आणखी दोघांना राज्यपाल म्हणून नेमले जाईल. या दोघांची डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात नियुक्ती झाली होती.
नजमा हेपतुल्ला यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शाहनवाज हुसैन यांना राज्यसभेवर घेतले जाण्याची शक्यता आहे.