नाकावाटे हवा नव्हे, विष...! दिल्लीत शाळांना दोन दिवस सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 07:43 AM2023-11-04T07:43:58+5:302023-11-04T07:44:13+5:30
अनावश्यक बांधकामांवर टाकली बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिवाळीच्या आगमनापूर्वीच आज राजधानी दिल्लीला वायू प्रदूषणाचा जबरदस्त विळखा पडून हवेची गुणवत्ता अतिशय चिंताजनक पातळीवर पोहोचली. प्रदूषणाचा तडाखा इतका तीव्र होता की आज शंभर मीटर अंतरावरुनही इंडिया गेट दिसणे दुरापास्त झाले होते. दिल्लीतील अनेक भागांमध्ये आज हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४६० ते ८६५ पर्यंत पोहोचला.
प्रदूषण नियंत्रणासाठी उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासोबत बैठक बोलावली. या बैठकीला केजरीवाल यांनी जाणे टाळले. राज निवास येथे झालेल्या या बैठकीसाठी पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी हजेरी लावली. वायू प्रदूषणाच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने बैठक बोलवावी तसेच शेजारी राज्यांनीही ठोसपावले उचलावी, अशी मागणी राय यांनी केली.
डॉक्टरांचा सल्ला...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व सरकारी व खासगी शाळा पाचवीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगून डॉक्टरांनी नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
पावले उचला : एनजीटी
हवेच्या गुणवत्तेत घसरण झाल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने हवा गुणवत्ता निर्देशांक घसरलेल्या राज्यांच्या मुख्य सचिवांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. १० नोव्हेंबरपूर्वी याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही लवादाने दिले आहेत.