विमानात अचानक वाजले राष्ट्रगीत!
By admin | Published: April 24, 2017 12:40 AM2017-04-24T00:40:19+5:302017-04-24T00:40:19+5:30
गेल्या आठवड्यात, १८ एप्रिल रोजी, तिरुपतीहून आलेले स्पाइस-जेट कंपनीचे विमान हैदराबाद विमानतळावर उतरण्याच्या बेतात
इंदूर : गेल्या आठवड्यात, १८ एप्रिल रोजी, तिरुपतीहून आलेले स्पाइस-जेट कंपनीचे विमान हैदराबाद विमानतळावर उतरण्याच्या बेतात असताना, विमानातील ध्वनिक्षेपण यंत्रणेवर अचानक राष्ट्रगीत लावण्यात आल्याने प्रवासी अचंबित झाले.
या विमानाने प्रवास केलेल्या पुनीत तिवारी या प्रवाशाने या संदर्भात रीतसर तक्रार नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विमान उतरण्याच्या तयारीत असल्याने सर्व प्रवाशांना खुर्च्या सरळ ठेवून सुरक्षा पट्टे बांधण्यास सांगण्यात आले होते. वैमानिकाने दिलेल्या सुरक्षा निर्देशांचे पालन करायचे की, ते झुगारून व बांधलेला पट्टा सोडून राष्ट्रगीतासाठी उभे राहायचे, अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या प्रवाशांची मोठी पंचाईत झाली.
नेमके काय घडते आहे हे कळायच्या आत, एका विमान कर्मचाऱ्याने ध्वनिक्षेपण यंत्रणा चटकन बंद केली, पण थोड्याच वेळात ती पुन्हा सुरू होऊन राष्ट्रगीत वाजू लागले, असे तिवारी यांची तक्रारीत म्हटले आहे.
बँक मॅनेजर असलेल्या तिवारी यांनी या घटनेचा व्हिडीओही काढला. अशा प्रकारे राष्ट्रगीत विमानात वाजविण्याच्या पोरखेळाने आपले मन व्यथित झाले, असेही त्यांनी नमूद केले. पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीसह प्रवास करणाऱ्या तिवारी यांनी विमान कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, पण विमानाच्या आॅडिओ सीस्टिममध्ये राष्ट्रगीत आधीपासूनच भरलेले असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. अशी घटना घडल्याचे स्पाइस-जेटच्या प्रवक्त्याने मान्य केले व यामुळे प्रवाशांची काही गैरसोय झाली असल्यास, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)