नालंदा हेच पेपरफुटीचे केंद्र ! २००३ साली कॅट गैरव्यवहार, नीट-यूजी प्रकरणातील आरोपी याच जिह्यातील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 07:09 AM2024-06-23T07:09:57+5:302024-06-23T07:12:38+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नालंदा जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांचा जिल्हा या प्रकरणांमुळे चर्चेत आला आहे.

Nalanda is the center of paper futi accused in the 2003 CAT embezzlement, NEET-UG case is from the same district | नालंदा हेच पेपरफुटीचे केंद्र ! २००३ साली कॅट गैरव्यवहार, नीट-यूजी प्रकरणातील आरोपी याच जिह्यातील

नालंदा हेच पेपरफुटीचे केंद्र ! २००३ साली कॅट गैरव्यवहार, नीट-यूजी प्रकरणातील आरोपी याच जिह्यातील

एस. पी. सिन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : नीट-यूजीप्रमाणेच इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण उजेडात आले की, या गैरकृत्याची पाळेमुळे नालंदा जिल्ह्यात असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे नालंदा जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांचा जिल्हा या प्रकरणांमुळे चर्चेत आला आहे.

याआधी आयआयएम, एमबीबीएस, कॅट, बँकेच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणांत रंजीत डॉन असल्याचे आढळले. तो नालंदा जिल्ह्याचा रहिवासी आहे. २०१२ साली फूड इन्स्पेक्टर या पदासाठीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी संजीव मुखियाचे नाव पुढे आले होते. अशाच एका प्रकरणात दीपक कुमार या आरोपीचे नाव चर्चेत होते. तोही नालंदा जिल्ह्याचाच रहिवासी आहे. 

संजीव मुखिया हाच सूत्रधार
नीट-यूजी प्रकरणाच्या पोलिस तपासात संजीव मुखिया ऊर्फ लूटन मुखिया याचे नाव समोर आले आहे. त्यानेच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा दावा करण्यात येत आहे. २००३ साली कॅट परीक्षेत झालेले गैरव्यवहार ते आताच्या नीट-यूजी परीक्षेचे प्रकरण यामागे नालंदा जिल्ह्यातील आरोपीच असल्याचे दिसून आले आहे.

यातील सत्य उजेडात आणू - तेजस्वी यादव

  • तेजस्वी यादव म्हणाले की, नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका कोणी फोडली याचा बिहार सरकारने तपास केला नाही तर राजद या प्रकरणातील सत्य उजेडात आणणार आहे.
  • या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप झालेल्या संजीव मुखिया याची विविध राजकीय नेत्यांसोबत छायाचित्रे असून ती आम्ही लवकरच जनतेसमोर ठेवणार आहोत. देशामध्ये भाजप व मित्रपक्षांची जिथे सरकारे आहेत, त्या राज्यांमध्ये सातत्याने प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना घडत आहेत.   
  • परीक्षांची प्रश्नपत्रिका बिहारमध्ये फुटली होती. त्याच लोकांनी आता नीट-यूजी परीक्षेमध्ये देखील गैरव्यवहार केल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणातील संजीव मुखिया याची तपास यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली.
  • या प्रकरणातील सत्ताधारी जद(यू) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात चांगली जुंपली आहे. जनता मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याच पाठीशी आहे हे लोकसभा निवडणूक निकालांतून दिसून आले. मतदारांचे आभार मानण्यासाठी तेजस्वी यादव यांनी आयोजित केलेल्या यात्रेतून त्यांना पार काही फायदा होणार नाही, असे जदयूचे नेते म्हणत आहेत. 

लालूप्रसाद यांच्याशी संबंध का जोडता? जद(यू)चा सवाल
नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे जनता दल (यू) ने म्हटले आहे. या प्रकरणावरून बिहारमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांत शाब्दिक चकमकी होत आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत.

जनता दल (यू)चे खासदार संजयकुमार झा यांनी सांगितले की, कोणत्याही घटनेचा राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाशी संबंध का जोडला जातो, असा सवाल जनता दल (यू) चे खासदार संजयकुमार झा यांनी केला आहे. 

झा यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकारामागे असलेल्या लोकांना पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणाचा तपास जोवर पूर्ण होत नाही तोपर्यंत या विषयावर अधिक काही बोलणे उचित होणार नाही. मात्र, या प्रकरणात राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या निकटवर्तीयांची नावे पुढे येत आहेत. अशा सर्व घटनांचा संबंध तेजस्वी यादव यांच्याशी का जोडला जात आहे? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, असेही खासदार संजयकुमार झा म्हणाले.

Web Title: Nalanda is the center of paper futi accused in the 2003 CAT embezzlement, NEET-UG case is from the same district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.