'ताजमहालमध्ये आता करता येणार नाही नमाज पठण'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:46 PM2018-07-09T17:46:00+5:302018-07-09T17:47:07+5:30
सर्वोच्च न्यायालयानं ताजमहालमध्ये नमाज पठण करण्यावर बंदी घातली आहे.
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं ताजमहालमध्ये नमाज पठण करण्यावर बंदी घातली आहे. ताजमहाल हे जगातलं सातवं आश्चर्य आहे. त्यामुळे ताजमहाल परिसरात नमाज पठण करण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. इतर ठिकाणीही नमाज पठण केलं जाऊ शकतं. मग ताजमहालमध्ये नमाज पठण करण्याची काय गरज आहे, असा सवालही न्यायालयानं विचारला आहे.
ताजमहालमध्ये होत असलेल्या नमाज पठणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय इतिहास संकलन समितीनं ऑक्टोबर 2017मध्ये बंदी घालण्याची मागणी केली होती. ताजमहाल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. मुसलमानांना धार्मिक स्थळाच्या रूपात ही राष्ट्रीय संपत्ती वापरण्याचा हक्क दिला गेला आहे काय, असा प्रश्न अखिल भारतीय इतिहास संकलन समितीनं उपस्थित केला होता. जर ताजमहालमध्ये मुसलमानांना तुम्ही नमाज पठण करण्याचा अधिकार देत असाल तर हिंदूंनाही शिव चालिसेचा जप करण्याची परवानगी द्यावी, असं मत अखिल भारतीय इतिहास संकलन समितीनं न्यायालयात याचिकेद्वारे मांडलं होतं.
दरम्यान, जगातील सातवं आश्चर्य असलेला ताजमहाल दर शुक्रवारी नमाज पठणासाठी बंद ठेवण्यात येत होता. त्याचा अनेक स्तरांतून विरोध दर्शवला जात होता. तर काहींच्या मते, ताजमहाल ही वास्तू शिव मंदिराच्या जागेवर बनवण्यात आली असून, ती एका हिंदू राजानं बनवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताजमहालमध्ये शीव चालिसा वाचण्याचा प्रयत्न केला असता सीआयएसएफच्या जवानांनी त्यांना रोखलं होतं.