भारतविरोधकाचे नाव बेटाला कशाला?
By admin | Published: March 23, 2017 12:47 AM2017-03-23T00:47:41+5:302017-03-23T00:47:53+5:30
अंदमान निकोबार बेटावरील एका बेटाचे नाव ‘हॅवलॉक’ असे आहे. हा हॅवलॉक १८५७ मध्ये भारताविरुद्ध लढला होता.
नवी दिल्ली : अंदमान निकोबार बेटावरील एका बेटाचे नाव ‘हॅवलॉक’ असे आहे. हा हॅवलॉक १८५७ मध्ये भारताविरुद्ध लढला होता. एवढेच नव्हे, तर राणी लक्ष्मीबार्इंविरुद्धही त्याने युद्ध केले होते. असे असताना या बेटाला त्यांचे नाव कशासाठी? असा सवाल भाजपाचे सदस्य एल. ए. गणेशन यांनी बुधवारी राज्यसभेत केला.
राज्यसभेत यावर बोलताना एल. ए. गणेशन म्हणाले की, १८५७ च्या उठावात हॅवलॉक हे भारतीय सैनिकांविरुद्ध लढले होते. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविरुद्धही त्यांनी लढाई केली होती. लंडनमध्ये ट्राफलगर स्क्वेअर येथे हॅवलॉक यांचा पुतळाही उभारण्यात आला आहे. भारताविरुद्ध लढल्यामुळे त्यांना त्या देशात सन्मानितही करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या ६० पेक्षा अधिक वर्षांनंतरही हॅवलॉक यांचा पुतळा कायम आहे.
आमच्या देशभक्तांचा यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? असा सवालही गणेशन यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही अंदमानच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, याची आठवण त्यांनी करुन दिली. यावर बोलताना उपाध्यक्ष पी. जे. कुरियन म्हणाले की, हा एक चांगला सल्ला आहे. यावर सरकारने विचार करण्याची गरज आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)