दिल्लीतील शाहजहाँ रोडला दशरत मांझींचे नाव द्या - भाजपा
By Admin | Published: September 21, 2015 04:53 PM2015-09-21T16:53:42+5:302015-09-21T16:53:42+5:30
दिल्लीतील शाहजहाँ रोडचे नामकरण दशरथ मांझी रोड करावे अशी मागणी दिल्लीतील भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - दिल्लीतील शाहजहाँ रोडचे नामकरण दशरथ मांझी रोड करावे अशी मागणी दिल्लीतील भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. औरंगजेब रोडच्या नामकरणाचा वाद आता शमला असतानाच भाजपा नेत्याने शाहजहाँ रोडच्या नामकरणाची मागणी केल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असे ठेवण्यात आले होते. यावरुन वादही निर्माण झाला होता. हा वाद ताजा असतानाच दिल्लीतील भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांनी शाहजहाँ रोडच्या नामकरणाची मागणी केली आहे. या रस्त्याला दशरथ मांझी यांचे नाव द्यावे असे उपाध्याय यांचे म्हणणे आहे. दशरथ मांझी यांनी बिहारमध्ये डोंगर फोडून गावासाठी रस्ता तयार केला होता. दशरथ मांझी हे प्रेम, समर्पण आणि ध्येयाचे प्रतिक असून मोगल राज्यकर्ते हे लालसेचे प्रतिक होते असे उपाध्याय यांनी पत्रात म्हटले आहे. यापूर्वीही मुगल राज्यकर्त्यांची नाव असलेल्या सर्व रस्त्यांचे नामकरण करण्याची मागणी हिंदूत्ववादी संघटनांकडून वारंवार केली जात होती.