'फिल्म सिटीला सुशांतसिंह राजपूतचं नाव द्या, आत्महत्येचा CBI तपास करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 09:12 AM2020-07-01T09:12:39+5:302020-07-01T09:17:59+5:30
सुशांतसिंहच्या मृत्युप्रकरणी राजद नेते तेजस्वी यादव आणि अभिनेता शेखर सुमन यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे
मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन आठवडे पूर्ण होत आहेत. पण, त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. सुशांतने डिप्रेशनमुळे आत्महत्या केली, असे मानले जात आहे. तर, बॉलिवूडमधील नेपोटीझममुळेच सुशांतचा बळी गेल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सुशांतच्या अकाली मृत्युनंतर बॉलिवूडसह क्रिकेट जगताला धक्का बसला असून राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजद पक्षाचे नेते तेजस्वी यादव यानी, सुशांतसिंहच्या मृत्युचा सीबीआय तपास करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
सुशांतसिंहच्या मृत्युप्रकरणी राजद नेते तेजस्वी यादव आणि अभिनेता शेखर सुमन यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये, महाराष्ट्र सरकारने सुशांतच्या मृत्युप्रकरणाची निपक्ष चौकशी करुन हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा. याप्रकरणी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाराष्ट्र सरकारला संवाद साधावा. तसेच, राजगीर येथे होऊ घातलेल्या फिल्मसिटीला सुशांतसिंह राजपूतचे नाव देण्यात यावे, अशा विविध मागण्या या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार से मामले की CBI जांच के लिए बात करेंगे और साथ ही राजगीर में बननेवाली फिल्म सिटी का नामकरण सुशांत सिंह राजपूत के नाम पर करने का आश्वासन दें: राजद नेता तेजस्वी यादव https://t.co/KVvJPoPGVc
— ANI_HindiNews (@AHindinews) June 30, 2020
शेखर सुमन यांनी सुशांतच्या आत्महत्येवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले असून ही आत्महत्या नसल्याचे म्हटले आहे. जर, सुशांतला आत्महत्या करायची असती, तर त्याने सुसाईड नोट लिहिली असती. अखेर असे कोणते कारण होते की, त्यामुळे त्याला 50 वेळा सीमकार्ड बदलावे लागले आहे. जर, त्याने कुर्त्याने फाशी लावून घेतली असेल, तर त्याच्या गळ्यावर वेगळेच निशाण दिसले असते. सुसाईडनंतर चेहरा खराब होत असतो, पण सुशांतचा चेहरा अजिबात खराब झाला नव्हता, असे शेखर यांनी म्हटले आहे. बॉलिवूडमधील नेपोटीझमवर बोलताना, बॉलिवूडमध्ये केवळ नेपोटीझम नसून गॅँग्जम आहे, येथे टॅलेंटला दाबण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोपही सुमन यांनी केला.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतने टीव्ही सिरीयलमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर, काय पो छे या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखलवी. तर, एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाने सुशांतला चांगलेच ग्लॅमर मिळाले. महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारीत या चित्रपटानंतर त्याला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळाले. तसेच, सुशांतचे नाव घराघरात पोहोचण्यासही या चित्रपटाची मोठी मदत झाली. एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे सुशांतसिंहचा दिग्गज क्रिकेटर्संशीही जवळून संबंध आला. त्यामुळेच, तो कोट्यवधींचा चाहता बनला होता.