खेलरत्नसाठी बजरंग व विनेश यांच्या नावांची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 01:47 AM2019-04-30T01:47:40+5:302019-04-30T06:25:07+5:30
भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) नुकत्याच आशियाई चॅम्पियन ठरलेला बजरंग पूनिया व गेल्या वर्षी आशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेती विनेश फोगाट यांची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) नुकत्याच आशियाई चॅम्पियन ठरलेला बजरंग पूनिया व गेल्या वर्षी आशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेती विनेश फोगाट यांची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. डब्ल्यूएफआने बजरंग व विनेश यांची गेल्या दोन वर्षांतील शानदार कामगिरी बघता सोमवारी त्यांच्या नावांची पुरस्कारासाठी शिफारस केली.
डब्ल्यूएफआयचे अधिकारी म्हणाले, ‘या दोघांनी अर्ज सादर केले होते. त्यानंतर डब्ल्यूएफआयने त्यांच्या नावांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली.’ जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बजरंगने अलीकडेच शियानमध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. विनेश आशियाई चॅम्पियनशिपमध्ये केवळ कांस्यपदक जिंकू शकली, पण ती नव्या गटात ५३ किलोमध्ये खेळत होती. ती २०१८ मध्ये आशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिला भारतीय महिला मल्ल ठरली.
बजरंग व विनेश यांच्या व्यतिरिक्त डब्ल्यूएफआयने राहुल आवारे, हरप्रीत सिंग, दिव्या काकरान व पूजा ढांडा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. २५ वर्षीय पूजाने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य व राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. २१ वर्षीय दिव्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. राष्ट्रकुल व आशियाई गेम्समध्ये ती तिसऱ्या स्थानी होती. आवारे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता, तर हरप्रीत आशियाई चॅम्पियनशिपचा रौप्य विजेता आहे. गेल्या वर्षी बजरंगने खेलरत्न न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती. त्यावेळी क्रिकेटपटू विराट कोहली व भारोत्तोलक मीराबाई चानू यांना हा पुरस्कार मिळाला होता.
नेमबाजी महासंघातर्फे हीना, अंकुर यांची ‘खेलरत्न’साठी शिफारस
राष्ट्रीय नेमबाजी महासंघाने सोमवारी पिस्तूल नेमबाज हीना सिद्धू व ट्रॅप नेमबाज अंकुर मित्तल यांची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डसाठी शिफारस केली. अंजुम मोदगिल (रायफल), शाहजार रिजवी (पिस्तूल) आणि ओम प्रकाश मिथरवाल (पिस्तूल) यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
विश्वकप, राष्ट्रकुल स्पर्धा,
राष्ट्रकुल चॅम्पियनशिप आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणारी २९ वर्षीय हीना आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली भारतीय पिस्तूल नेमबाज आहे. तिच्या नावावर १० मीटर एअर पिस्तूल फायनलमध्ये २०३.८ च्या स्कोअरच्या विश्वविक्रमाची नोंद आहे.