दुर्दैव! शत्रूंशी मुकाबला करणाऱ्या भारतीय जवानांचेही एनआरसी यादीत नाव नाही; सैनिक झाले हतबल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 01:07 PM2019-09-03T13:07:07+5:302019-09-03T13:07:46+5:30
सीमेवर आम्ही भारतीय जवान आहोत अन् आपल्याच घरामध्ये आम्हाला भारतीय नागरिकत्वासाठी लढावं लागत आहे
आसाम - बारापेटा जिल्ह्यातील एक गाव जे सैनिकांचे गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात जवळपास 200 कुटुंब राहते. या गावातून 20 पेक्षा अधिक तरुण भारतीय लष्कर आणि अन्य सुरक्षा यंत्रणेत कामाला आहेत. मात्र गावातील अनेक जवानांची नावे एनआरसी यादीत समाविष्ट न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एनआरसी यादी 31 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आली.
दिलबर हुसैन यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे एनआरसी यादीत मिळाली नाहीत. दिलबर हुसैन हे भारतीय लष्करात आहेत. हुसैन यांचे छोटे भाऊ मिजनूर अली सीआयएसएफमध्ये कार्यरत आहेत. एनआरसी यादीत या दोघांचीही नावे नाहीत. तर त्यांचे मोठे भाऊ सईदुल इस्लाम यांचे नाव एनआरसी यादीत आहेत. ते लष्करात सुबेदाराचं काम करत होते. कारगिल लढाईतही त्यांनी सहभाग घेतला होता.
दिलबर हुसैन यांनी सांगितले की, आम्ही शत्रूंशी लढाई लढतो. आम्ही जवानांच्या कुटुंबाला प्राधान्य देतो मात्र एनआरसी यादीत आमचं नाव नसल्याने दुख: झालं. सीमेवर आम्ही भारतीय जवान आहोत अन् आपल्याच घरामध्ये आम्हाला भारतीय नागरिकत्वासाठी लढावं लागत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
सीआयएसएफ जवान मिजनूर अली यांनी एनआरसी यादीवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, सीआयएसएफच्या भरतीवेळी मी व्हेरिफिकेशन करताना सांगितलं होतं की, मी बाहेरून आलो आहे, 2003 मध्ये बांग्लादेशातून भारतात आलो. मग त्यावेळी मला डीएसपी यांनी व्हेरिफिकेशन झाल्यावर सीआयएसएफमध्ये जवान म्हणून कार्यरत कसं केलं? असा सवाल उपस्थित केला आहे.
असाच प्रकार भारतीय जवान अजित अली यांच्यासोबत घडला आहे. अजित अली यांचे नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीतही आलं नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब चिंतेत होतं. ज्यावेळी अंतिम यादी प्रसिद्ध झाली त्यानंतर माझे वडिलांना रडू आलं. माझं कुटुंब काही बोलत नसलं तरी त्यांना हा विचार सतावत आहे की, त्यांनी आम्हाला परदेशी कसं घोषित केलं? आता आम्ही काय करू? शत्रूंशी मुकाबला करू की भारतीय नागरिकत्वासाठी झगडत राहू हा प्रश्न पडला आहे असं त्यांनी सांगितले.