विनय क्वात्रा, विक्रम मिसरी यांची नावे अमेरिकेतील नव्या राजदूताच्या शर्यतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 06:25 AM2024-01-30T06:25:06+5:302024-01-30T06:26:10+5:30
Vinay Kwatra: भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू हे येत्या ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शर्यतीत विनय मोहन क्वात्रा तसेच विक्रम मिसरी या दोन ज्येष्ठ राजदूतांची नावे आघाडीवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नवी दिल्ली - भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू हे येत्या ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शर्यतीत विनय मोहन क्वात्रा तसेच विक्रम मिसरी या दोन ज्येष्ठ राजदूतांची नावे आघाडीवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अमेरिकेत नव्या भारतीय राजदूताची नेमणूक लवकरच केली जाईल, असे तरणजीतसिंग संधू यांना केंद्र सरकारने कळविले आहे. परराष्ट्र सचिव असलेल्या विनय मोहन क्वात्रा यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. विक्रम मिसरी हे सध्या राष्ट्रीय सुरक्षा कौन्सिलच्या सचिवालयात उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या दोघांपैकी एका व्यक्तीची भारताच्या अमेरिकेतील राजदूतपदी नियुक्ती होईल, अशी चर्चा आहे.
सरकारची खास मर्जी
क्वात्रा व मिसरी हे दोन्ही मोदी सरकारच्या खास मर्जीतले म्हणून ओळखले जातात. ते दोघे जण पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या निकटवर्तीयांपैकी आहेत. या तीन जणांचे ज्या नावावर एकमत होईल तीच व्यक्ती नवा राजदूत असेल, असे सांगण्यात येते. विनय मोहन क्वात्रा यांची या पदासाठी नेमणूक झाली तर मिसरी यांना वेगळी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.