राज्यसभेसाठी राष्ट्रपती नियुक्त 6 खासदारांच्या नावांची घोषणा
By admin | Published: April 22, 2016 07:39 PM2016-04-22T19:39:11+5:302016-04-22T21:13:19+5:30
राज्यसभेच्या खासदारपदी राष्ट्रपतीनियुक्त 6 खासदारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22- राज्यसभेच्या खासदारपदी राष्ट्रपतीनियुक्त 6 नावांची घोषणा करण्यात आली आहे. प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, बंगालमधले भाजप नेते स्वप्नदास गुप्ता, बॉक्सर मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि मल्याळम अभिनेता सुरेश गोपी यांची खासदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे खासदार आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांच्यासह इतर 6 सदस्यांची खासदारपदाची मुदत संपली होती. त्यांच्या जागेवर या 6 जणांची वर्णी लागली आहे. नरेंद्र जाधव हे नियोजन आयोगाचे सदस्य होते. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, बंगालमधले भाजप नेते स्वप्नदास गुप्ता, बॉक्सर मेरी कोम आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हेसुद्धा आता खासदार झाले आहेत. राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त दहापैकी सात सदस्यांच्या जागा रिक्त झाल्याने त्यापैकी सहा जागांवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. सातव्या जागेसाठी विविध नावांची चर्चा सुरू तसेच स्पर्धा दिसत आहे.
सात सदस्यांच्या निवृत्तीनंतर तिथे कोणाच्या नियुक्ती होणार, यावर गेले काही दिवस दिल्लीत तर्कवितर्कांना उधाण आले होते. चर्चेमध्ये इंडिया टीव्हीचे रजत शर्मा, झी टीव्हीचे सुभाषचंद्र आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र पक्षामध्ये एकमत न झाल्यामुळे सातव्या जागेवर नियुक्ती करण्यात आलेली नाही.
सुब्रमण्यम स्वामी व डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता. डॉ. जाधव हे अर्थतज्ज्ञ असून, ते नियोजन आयोगावर होते. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार समितीवरही होते. त्यांच्यामार्फत दलित समाजाला पक्षाजवळ आणण्याची भाजपाची इच्छा आहे. स्वप्न दासगुप्ता यांच्या नियुक्तीसाठी अर्थमंत्री अरुण जेटली प्रयत्नशील होते. लोकसभा निवडणुकीत अमृतसर मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीच प्रयत्न केला.
ईशान्येकडील सात राज्यांत तसेच केरळमध्ये येत्या काळात पाय रोवण्याचे भाजपा जोरदार प्रयत्न करणार आहे. त्यादृष्टीने पावले पडायला सुरुवात झाली असून, मेरी कोम आणि मल्याळम अभिनेते सुरेश गोपी यांची नियुक्ती त्याचाच भाग आहे.
या नियुक्त्यांमुळे राज्यसभेत मोदी सरकारला पाठिंबा देणा-या सदस्यांची संख्या वाढणार असून, राज्यसभेत भाजपाचे 47 तर मित्रपक्षांचे 13 असे 60 सदस्य आहेत. आता सरकारला 66 जणांचा पाठिंबा मिळेल. शिवाय आणखी एक जागा लवकरच भरली जाईल, असे सांगण्यात येते. जुलैमध्ये राज्यसभेच्या 15 जागांसाठी निवडणूक होणार असून, त्याद्वारे आपले 72 सदस्य वाढतील, याची भाजपाला खात्री आहे.
राष्ट्रपतीनियुक्त 10 सदस्यांपैकी दोन खासदार गेल्या नोव्हेंबरमध्ये, तर पाच सदस्य 2 एप्रिल रोजी निवृत्त झाले. उरलेले तिघे सदस्य 2018 साली निवृत्त होत आहेत.